Pune : देशातील पहिले अॅग्री हकेथॉन आजपासून पुण्यात सुरू झाले आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच ३ जूनपर्यंत कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगरजवळील मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १४० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत.
दरम्यान, आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, कृषी महाविद्यालय पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर देशभरातून १४० पेक्षा अधिक संकल्पना या कार्यक्रमात बघायला मिळणार आहेत.
यासाठी देशभरातून ५५० पेक्षा जास्त स्टार्टअप किंवा कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील १५० कंपन्यांची हॅकेथॉनमध्ये प्रत्यक्ष निवड करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी, स्टार्टअप खासगी कंपन्या यांचा सामावेश आहे. बक्षिसे मिळाल्यानंतरही या संकल्पनेची थेट कृषी क्षेत्रात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासोबतच काही सहकारी संस्थेच्या माध्यमातून या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, कृषीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नव्या संकल्पना, नवे स्टार्टअप यांना प्रोत्साहन देण्यासाठी या हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ८ टप्प्यातील संकल्पना किंवा स्टार्टअप्सना १६ बक्षिसे देण्यात येणार असून यामध्ये एकूण १६ बक्षिसे देण्यात येणार आहेत. पहिले बक्षिस हे २५ लाख तर द्वितीय बक्षीस हे १५ लाख रूपयांचे असणार आहे.