नोव्हेंबर महिन्यात कोकणातील ग्रामीण भागात फिरताना आंब्याप्रमाणेच काजूच्या मोहराचाही सुगंध नाकात शिरतो आणि मनाला वेगळीच टवटवी येते. खर्च आणि मेहनतीचा विचार केला तर आंब्यापेक्षा काजूची लागवड अधिक उत्पन्न देऊ शकते. पण, दुर्दैवाने काजू लागवडीतून केवळ काजूगराचेच उत्पन्न हाती येते. काजूची बोंडे वाया जातात. त्यामुळे कोकणात दर्जेदार काजू उत्पादित होत असला तरी त्याच्यामागचे दुष्टचक्र कायम आहे आणि त्याला मानाचे अपेक्षित स्थान मिळालेले नाही.
साधारणपणे १९९०पर्यंत झालेली काजूची लागवड अधिकाधिक हौसेचा मामलाच होती. जागा आहे, काहीतरी लागवड करायची आहे म्हणून ती लागवड झाली होती. पण १९९० साली फलोत्पादन योजना आली आणि कोकणातील विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लागवडीला गती आली. त्यात व्यावसायिकपणा आला. गेल्या ३५ वर्षांत या योजनेचा लाभ हजारो लोकांनी घेतला.
त्यातही रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याच्या तुलनेत काजूची लागवड दीडपट अधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थितीही काहीशी अशीच आहे. आंब्यापेक्षा कमी मेहनत आणि कमी खर्च करावा लागत असला तरी काजू फायदेशीर होत नाही. कारण त्याची लाखो टन बोंडे फेकून दिली जातात. त्यावर प्रक्रिया होत नाही. केवळ बी ओल्या आणि पूर्ण तयार स्वरुपात विकली जाते.
काजू बोंडावर प्रक्रिया करून त्यापासून वाइन आणि सिरप तयार करता येते. हे प्रयोग दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाने यशस्वी करून दाखवले आहेत. मात्र, त्यासाठी प्रक्रियादार पुढे येत नाहीत. झाडावरून काढल्यानंतर तीन ते चार तासात काजू बोंडावर प्रक्रिया सुरू करावी लागते, अन्यथा ती कुजण्याची प्रक्रिया हळूहळू सुरु होते. तीन तासात त्यावर प्रक्रिया सुरू करणे अवघड आहे. त्यामुळे या उद्योगाला अपेक्षित गती आलेली नाही.
परदेशी काजूने कंबरडे मोडले
परदेशात अत्यंत स्वस्तात काजू बी मिळते. त्याला रंग, आकार आणि चव नसते. पण, तो स्वस्त मिळतो. त्यामुळे त्यात कोकणातील दर्जेदार आणि चविष्ट काजू मिसळून प्रक्रिया केली जाते. असा प्रकार अनेकजण करतात. त्यामुळे स्थानिक काजूबी दर्जेदार असूनही त्याला अपेक्षित दर मिळत नाही. त्यासाठी परदेशी काजूबी आयात करण्यावर काही निर्बंधांची गरज आहे.
मनोज मुळ्ये
उपमुख्य उपसंपादक, लोकमत
रत्नागिरी.