Join us

खरीप हंगामाची तयारी ४३ अंश तापमानात सुरू; शेतकरी झेलतोय ऊन अन् वारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:45 AM

सेलू तालुक्यातील स्थिती

रेवणअप्पा साळेगावकर

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला. भरदुपारी उन्हात घराबाहेर निघणे कठीण आहे. दुपारच्या सुमारास नेहमी गजबजलेले रस्तेही निर्मनुष्य दिसताय; मात्र शेतीची कामे आपल्यालाच करावी लागणार, यासाठी जगाचा पोशिंदा शेतकरी रखरखत्या उन्हात ४३ अंशांचा उन्हाचा पारा अंगावर झेलत खरिपातील पेरणीसाठी मशागतीत व्यस्त आहे.

सेलू तालुक्यातील ९२ गावांत ६५ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ हजार हेक्टर खरीप पेरणीचे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सेलू तालुक्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एप्रिलनंतर मे महिन्याच्या प्रारंभी उन्हाचा भडका उडाला आहे. तरीही जगाचा पोशिंदा शेतकरी रखरखत्या उन्हात खरिपातील पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यात व्यस्त आहे. गतवर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांचे वार्षिक बजेट बिघडले आहे.

उत्पादन खर्च वाढला त्या तुलनेत उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीचे दिवस संपले आहेत. निसर्ग साथ देत नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला तयार नाही.

सारी यंत्रणाच शेतकऱ्यांना मारक ठरली आहे. तरीही मोठ्या हिंमतीने बळीराजा शेती करतो आहे. कापसाचे दर कोलमडल्याने कवडीमोल भावाने कापूस, सोयाबीन विकावा लागला. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे कर्जाचा फास दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे.

उन्हाळ्यात अवकाळी पाऊस

• शेतकऱ्यांना आता कुणीच वाली उरला नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मशागतीला सुरुवात केली आहे. यंदा उन्हाळ्यातही अवकाळी पाऊस पडत आहे.

• त्यामुळे खरिपातील पेरणीसाठी वेळेवर पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी लगबगीने ४३ अंशांचा पारा अंगावर झेलत रखरखत्या उन्हात शेतीच्या कामात व्यस्त आहेत.

उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे रस्ते निर्मनुष्य

सेलू तालुक्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेला आहे. रहदारीने दररोज गजबजलेले रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. भरउन्हात घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे.

पुन्हा नव्या उमेदीने शेतकरी लागला कामाला

• उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांची मशागत सुरू आहे. यंदा उत्पादन कमी आणि शेतमालाला दर कमी, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. उत्पन्न खर्च वाढला त्या तुलनेत यंदा शेतीमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

• गतवर्षीचा खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला होता. परिणामी शेतकरी २ कर्जबाजारी झाले आहेत; परंतु हार न मानता पुन्हा बळीराजा नव्या उमेदीने शेती करायला तयार झाला आहे.

हेही वाचा - नको चिंता हिरव्या वैरणीची; सुका चारा आहाराद्वारे फायदेशीर दुग्धव्यवसायाचा लागला शोध

टॅग्स :उष्माघातशेतीपीक व्यवस्थापनखरीपशेतकरीमराठवाडाविदर्भ