निरगुडसर : येथे रब्बी हंगामात योग्य नियोजन, आधुनिक शेतीपद्धती व शास्त्रीय व्यवस्थापनाच्या जोरावर बटाटा पिकातून विक्रमी उत्पादन घेण्याचे उदाहरण शेतकरी गुलाब जयराम टाव्हरे व मंगेश जयराम टाव्हरे यांनी घालून दिले आहे.
त्यांनी रब्बी हंगामात ३० पिशव्या (कट्टे) बियाण्यांची लागवड केली होती. त्यातून तब्बल ६०० (कट्टे) पिशव्या बटाट्याचे उत्पादन मिळाले आहे.
म्हणजेच एका बियाण्याच्या पिशवीमागे सुमारे वीस पिशव्या उत्पादन मिळाल्याने हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या यशामागे सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर, योग्य वेळी व शिफारशीनुसार करण्यात आलेली फवारणी, तसेच काटेकोर पीक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरले.
कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक व गरजेनुसार उपचारात्मक फवारण्या करण्यात आल्या.
त्यामुळे पिकाची वाढ जोमदार झाली व उत्पादनात मोठी वाढ झाली. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कोंबड खताच्या सात ट्रॅक्टर ट्रॉली वापरण्यात आल्या.
माती परीक्षणानुसार रासायनिक खते, वेळेवर पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत व तणनियंत्रण यावर विशेष भर देण्यात आला. या सर्व कामांसाठी एकरी ६० हजार रुपये खर्च झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
मात्र एवढे मोठे उत्पादन घेऊनही बाजारात बटाट्याला सरासरी प्रतिकिलो केवळ १० रुपये दर मिळत असल्याने अपेक्षित आर्थिक लाभ होत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव कमी असल्याने मेहनतीच्या तुलनेत नफा मर्यादित राहिला आहे. उत्पादन वाढ हे निश्चितच कौतुकास्पद असले तरी योग्य बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती परवडणारी ठरत नाही.
शासनाने बटाटा पिकासाठी हमीभाव, साठवणूक व्यवस्था व बाजार व्यवस्थापनाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
बाजारभावाचा प्रश्न
◼️ टाव्हरे बंधूंच्या या यशस्वी प्रयोगातून उत्पादनवाढीची दिशा स्पष्ट झाली असली, तरी बाजारभावाचा प्रश्न अद्याप गंभीर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
◼️ उत्पादन वाढ हे निश्चितच २ कौतुकास्पद असले तरी योग्य बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती परवडणारी ठरत नाही.
◼️ बटाट्याला सरासरी प्रतिकिलो केवळ १० रुपये दर मिळत असल्याने अपेक्षित आर्थिक लाभ होत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
अधिक वाचा: बँक खात्यांसाठी तुम्हाला ठेवता येणार आता एकापेक्षा अधिक 'वारस'दार; याचा कसा होणार फायदा?
