फलटण : गारपीरवाडी, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत आहिरेकर आणि स्वप्निल दंडिले यांनी खासदार शरद पवार यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली.
या भेटीत फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मांडले. या भेटीत चंद्रकात आहिरेकर यांनी नरेंद्र मोदी यांना गारपीरवाडी येथे पिकवलेले डाळिंब भेट दिले.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती; सोबत शेतकरी प्रतिनिधी म्हणून जाताना फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना शरद पवारांनी सोबत नेले आहे.
Rajya Sabha MP and former Union Minister Shri Sharad Pawar, along with a group of farmers, met PM @narendramodi today.@PawarSpeakspic.twitter.com/zAYUz06KCH
— PMO India (@PMOIndia) December 18, 2024
फलटण तालुक्यातील बहुतांश ठिकाणी डाळिंबाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी हे फळ उत्पादक शेतकरीच जाणू शकतात व त्या मांडू शकतात.
यासाठीच शरद पवार यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासमवेत करून दिली आहे.
फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात डाळिंब तसेच इतर सतरा प्रकारच्या फळांचे उत्पादन घेतले जाते.
उपराष्ट्रपती यांनाही डाळिंब भेट
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर फलटणच्या या शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्या समवेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेतली.
• उपराष्ट्रपती यांनाही डाळिंब भेट देऊन डाळिंब उत्पादनातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.