Pune : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजना म्हणजे पीएम किसान ही योजना लागू केली होती. या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रतिवर्षाला तीन टप्प्यामध्ये ६ हजार रूपये देण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना लागू केली आणि त्यामध्ये ६ हजार रूपयांची भर घातली.
यानुसार शेतकऱ्यांना १२ हजार रूपये प्रत्येक वर्षाला मिळत आहेत. पण १ जानेवारी २०२५ नंतर ज्या शेतकऱ्यांना या योजनांचा नव्याने लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना नव्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
ऑक्टोबर २०२४ पासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस्टॅक ही योजना लागू केली. शेतकऱ्यांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी आणि जमिनीची सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी ही योजना लागू केली आहे. या पोर्टलवर किंवा अॅपवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एक फार्मर आयडी देण्यात येणार आहे.
नव्याने म्हणजेच १ जानेवारी २०२५ नंतर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे किंवा अॅग्रीस्टॅक या योजनेंतर्गत नोंदणी करून फार्मर आयडी मिळवणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय नव्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना डिजीटल सेवा पुरवणे आणि कृषी विभागाच्या किंवा महसूल विभागाच्या कामाचा वेग वाढावा यासाठी अॅग्रीस्टॅक योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अॅग्रीस्टॅकवर नोंदणी केल्याशिवाय नव्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नसल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे.