प्रमोद येरावार
कापसाचे पीक निघाले की पहाटी बिनकामी ठरते. फारफार तर त्याचा वापर सरपणासाठी केला जातो. मात्र आता एका विद्यार्थ्याने याच पऱ्हाटीच्या टाकाऊ देठापासून प्लायवूड तयार केले. त्याच्या या प्रयोगाला विज्ञान प्रदर्शनीत पहिला क्रमांक मिळाला.
या विद्यार्थ्याचे नाव आहे ओवेसराज एस. माली. तो बल्लारपूर (जि. चंद्रपूर) पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. कापूस वेचून झाला की अनेक शेतकरी शेतातील पऱ्हाटी जाळून टाकतात. काही याच झाडांचा वापर सरपणासाठी करतात.
मात्र या कापसाच्या कचऱ्यापासून प्लायवूड तयार करण्याची कल्पना ओवेस या विद्यार्थ्याच्या डोक्यात आली. त्याने ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली. वियाणी जुबली स्कूल येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनीत त्याने ही संकल्पना पुढे ठेवली. त्याच्या या मॉडेलला पहिला क्रमांक मिळाला.
विशेष म्हणजे हा प्लायवूड तयार करायला फार खर्च नाही. शेतकरी आपल्या शेतात सहज प्लायवूड तयार करू शकतात. अध्यक्ष संजय वासाडे, व्यवस्थापिका प्रो. मेघा शुक्ला, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बाबुलकर यांनी त्याचे अभिनंदन केले. ओवेसला मिकीन, महेश जवळेकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
प्रदूषणाचा धोका होईल कमी
• हजारो हेक्टर शेतीतकापूस पीक घेतले जाते. या शेतातील कचरा फारच मोठ्या प्रमाणात निघत असतो. या कचऱ्याचे नियोजन करताना शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
• सोबतच मोठ्या प्रमाणात हा कचरा जाळला जात असल्याने प्रदूषणाचा धोकाही असतो. ओवेस याने केलेल्या प्रयोगामुळे कचरा व्यवस्थापन, प्रदूषणाचा धोका होईल कमी होण्यास मदत मिळणार आहे.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
