राजरत्न सिरसाट
राज्यातील ८७.३८ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून, राज्याने (रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्स्फर) निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे.
अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सन २०१८ पासून राबविण्यास सुरुवात झाली. दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे आहे; परंतु तीन लाखांवर शेतकऱ्यांची केवायसी अद्याप झाली नाही. दरम्यान, राज्यात ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ८६.९९ लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून, केंद्र शासनाकडे पाठिवण्यात आली आहे.
तीन लाखांवर शेतकऱ्यांची केवायसी नाही
• राज्यातील ३ लाख २४ हजारांवर शेतकऱ्यांची केवायसी अद्याप पूर्ण व्हायची आहे.
• कृषी विभाग, गणना विभागाने यासंबंधीचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे; परंतु केवायसी न झाल्याने हे शेतकरी या योजनेला मुकणार आहेत.
केवायसीच्या तीनही बाबींची पूर्तता केलेल्या ८७.३८ लाख शेतकरी कुटुंबांना यावेळी पीएम किसान सन्मानचा १६ वा हप्ता मिळणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. निधीसाठीची यादी केंद्र सरकारला पाठविली आहे. - दयानंद जाधव, उपायुक्त (गणना), कृषी आयुक्तालय, पुणे
