पुणे : एक रुपयात खरीप पीक विमा योजना बंद केल्यानंतर यंदापासून कंपन्यांनी ठरविलेल्या विम्याचा हप्ता भरून पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
ही योजना एक जुलैपासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये आतापर्यंत ६४ हजार पाचशे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला
असून, ४० हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे विमा संरक्षण करण्यात आले आहे, तर २१८ कोटींची रक्कम विमा संरक्षित झाली आहे.
शेतकऱ्यांनी यापोटी ३ कोटी ८५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. विमा उतरविणारे सर्वाधिक ८ हजार ५६३ शेतकरी नांदेड जिल्ह्यातील आहेत.
राज्य सरकारने तीन वर्षे खरीप पीक विमा एक रुपयात उपलब्ध करून दिला. मात्र, या योजनेत होणारी बनावटगिरी तसेच तोटा लक्षात घेता ही योजना पुन्हा मूळ स्वरूपात सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कंपन्यांनी ठरवलेला विमा हप्ता भरावा लागणार आहे. एक जुलैपासून ही योजना सुरू केली असून, ६४ हजार ४४६ शेतकऱ्यांनी ४० हजार ६५० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला.
पीकनिहाय विमा हप्ता ठरविला असल्याने या ६४ हजार शेतकऱ्यांनी ३ कोटी ८५ लाख रुपयांचा विमा हप्ता राज्य सरकारकडे जमा केला आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र सरकार प्रत्येकी ७ कोटी १८ लाख देणार आहे.
या योजनेत सर्वाधिक २५ हजार ३९८ शेतकरी लातूर विभागातील व ८ हजार ५६३ विमा उतरवणारे शेतकरी एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ पाच शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे.
मागील ४ दिवसांतील नोंदणी
३ जुलैची नोंदणी (सकाळी ११:०० पर्यंत)
२४,४९२
४ जुलैची नोंदणी (सकाळी ११:०० पर्यंत)
६४,४४६
गेल्या २४ तासांत झालेली नोंदणी
३९,९५४
विभागनिहाय शेतकरी संख्या
कोकण - २५६
नाशिक - ६,०३९
पुणे - ४,४८८
कोल्हापूर - १,२२४
संभाजीनगर - १७,४९१
लातूर - २५,३९८
अमरावती - ८,४०७
नागपूर - १,१४३
एकूण - ६४,४४६
पिक विमा उतरविण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवून जोखीम कमी करावी. - विनयकुमार आवटे, संचालक कृषी
अधिक वाचा: सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रातच; कोणत्या बँकेचे किती कर्ज? जाणून घ्या सविस्तर