सांगली : शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांतर्फे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते. या पीककर्जाच्या मर्यादेत वाढ केली आहे.
पाच लाख रुपयांपर्यंत पीककर्ज देण्यात येणार आहे. लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. १ एप्रिल २०२५ पासून बँका शासनाच्या नवीन आदेशाची अंमलबजावणी करणार आहेत.
शेतकऱ्यांना एक वर्षासाठी बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते. यावर्षी १ एप्रिल २०२५ पासून यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज दिले जात होते. सोयाबीन व तूर या पिकांच्या कर्जाच्या रकमेत वाढ नाही. सोयाबीन पिकासाठी ६०,९०० रुपये प्रति हेक्टरी पीककर्ज देण्यात येते.
तुरीसाठी ५० हजार ८२० रुपये पीककर्ज देण्यात येते. मूग व उडिद पीककर्जाच्या रकमेत वाढ केली असून त्याला आता २३,९४० रुपये पीककर्ज देण्यात येईल.
दोन लाख कर्ज हवे असल्यास सर्च रिपोर्ट
एक लाख ६० हजार रुपये पीक कर्ज हवे असल्यास सर्च रिपोर्ट काढावा लागत होता. यामध्ये वाढ केली असून, दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज असल्यास सर्च रिपोर्ट काढायचा आहे.
अजून आदेश नाहीत
पीककर्ज वाढीबाबत अद्याप बँकांना आदेश दिले नाहीत. १ एप्रिल पासून २०२५-२६ या वर्षासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात होईल. त्यामुळे त्यापूर्वी आदेश येण्याची शक्यता असल्याचे बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी सांगितले.
पाच लाखांची मर्यादा केली आहे. एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. पण, कर्ज १०० टक्के वर्षात भरल्यानंतर बिन व्याज मिळणार असून त्यातही तीन लाखापर्यंत बिन व्याज आणि दोन लाखाला ७ टक्के व्याज असणार आहे. - विश्वास वेताळ, लीड बँक व्यवस्थापक, सांगली
अधिक वाचा: आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर