शिवानंद फुलारी
अक्कलकोट : खडतर परिस्थितीत सुद्धा अक्कलकोट तालुक्यातून यंदा ६ ते ७ लाख टन ऊस गाळपासाठी विविध साखर कारखान्याला पाठवण्यात आला आहे.
मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही कारखानदारांनी सुरळीत बिल दिलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा बिलाकडे लागल्या आहेत.
मागच्या वर्षी तालुक्यात पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे विहिरी, बोअरला पाणी आले नव्हते. नदी, नाले, ओढा, तलाव कोरडे होते. पाण्याअभावी हजारो हेक्टर उसाच्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी नांगर फिरविला होता.
जनावरांना पिण्यासाठी पाण्याची चिंता होती. अशा बिकट परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर उसाला जपले होते. त्यासाठी बँक, सावकारी, पतसंस्था अशा विविध माध्यमातून कर्ज घेऊन ऊस जगवला.
या साखर कारखान्याने नेले ऊस
ओंकार (तडवळ), रेणुका अफझलपूर, लोकमंगल लोहारा, कंचेश्वर, भुसनूर, आळंद, जयहिंद आचेगाव, सिद्धेश्वर सोलापूर, मातोश्री रुददेवाडी, गोकूळ धोत्री या साखर कारखान्यांनी कोण कमी कोणी जास्त मिळेल तसा ऊस गाळपासाठी घेऊन गेले आहे. दर प्रत्येकांनी २७०० ते २७५५ पर्यंत जाहीर केलेले असले तरी अद्याप बिल दिले नाहीत. काही कारखानदारांनी नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत बिल दिले असले तरी काहींनी तेसुद्धा दिलेले नाहीत. परिणामी, लग्न, कार्ये, बँक कर्ज भरणे, असे अनेक कामे शेतकऱ्यांचे प्रलंबित राहिलेले आहेत.
उतारा घटला, गणित बिघडले
यंदाही शेवटपर्यंत मोठा पाऊस न होता भिज पाऊस होत गेला आणि यामुळे उसाची वाढ खुंटली. प्रति एकर उसाचा उतारासुद्धा निम्याने घटला. यामुळे उसाची शेती परवडेनाशी झाली आहे. त्यात कारखानादारांनी वेळेवर बिल देत नसल्यामुळे पुरते आर्थिक गणित बिघडले असल्याचे दिसून येत आहे.
माझा ऊस डिसेंबरमध्ये गेला आहे. अद्याप बिल आले नाही. मोठे कष्ट, खर्च करून वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे पालनपोषण करायचे आणि वेळेवर कारखानदार ऊस नेतात आणि बिल देत नसल्याने शेतकऱ्यांची सर्व बाजूने आर्थिक कोंडी होत आहे. शासनाने यासाठी कडक नियम केले पाहिजे, अन्यथा उसाची शेती काही दिवसाने बंद होईल. लहरी निसर्गामुळे, शेती व्यवसाय एक प्रकारचे जुगार झाला आहे. तसेच अडेलतट्टू कारखानदारांमुळे शेतकऱ्यांचा फज्जा उडाला आहे. - भीमाशंकर बिराजदार, शेतकरी
अधिक वाचा: ऊस दरासाठी कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळघरेच ठरताहेत भारी; गुळाला मिळतोय कसा दर?