आपल्या शेतात घाम गाळून पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे आता चीज होणार आहे. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२५ साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना आपले कसब दाखवण्याची संधी मिळणार असून, विजेत्यांना ५० हजार रुपयांपर्यतची भरघोस बक्षिसे जिंकता येणार आहेत.
इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण आणि आदिवासी अशा दोन स्वतंत्र गटांत पार पडणार आहे. यामध्ये हंगामातील मुख्य पिके जसे की ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
अशा आहेत अटी आणि नियम..!
• स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत. स्पर्धक शेतकऱ्याच्या नावे स्वतःची जमीन असणे आणि ती जमीन तो स्वतः कसत असणे अनिवार्य आहे.
• विशेष म्हणजे, एका शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठीही स्पर्धेत सहभाग नोंदवता येईल.
• मात्र, ज्या पिकासाठी स्पर्धा लढायची आहे, त्या पिकाची किमान ४० आर (एक एकर) क्षेत्रावर सलग लागवड केलेली असावी.
रब्बी सर्वसाधारण अन् आदिवासी गटातून निवड प्रक्रिया..!
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ३०० रुपये, तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी १५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीनही स्तरांवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडले जाणार आहेत.
