Join us

कृषी विभागाचा कांदा उत्पादन घाेळ उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 8:03 PM

नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यात कांद्याचे एकरी १० ते २० टन उत्पादन हाेत असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात कांद्याचे उत्पादन हेक्टरी १० ते २० टन असल्याचे नमूद केले आहे.

सुनील चरपेनागपूर: नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यात कांद्याचे एकरी १० ते २० टन उत्पादन हाेत असल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली. राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात कांद्याचे उत्पादन हेक्टरी १० ते २० टन असल्याचे नमूद केले आहे. कांद्याचे अडीच पटीने कमी केलेले उत्पादन कांद्यावरील विविध बंदीला कारणीभूत ठरल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत.

यावर्षी अति जाेरदार पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यातील खरीप कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची चार सदस्यीय कमिटी नाेव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या तिन्ही तालुक्यांमध्ये आली हाेती. या कमिटीतील सदस्यांनी राज्यातील काही कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि निघून गेले.

ही कमिटी या तिन्ही जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी येणार असल्याची पूर्वसूचना कुणालाही दिली नव्हती. या समितीतील सदस्यांनी कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व निर्यातदार यापैकी कुणाशीही कांदा नुकसानीची चर्चा केली नाही. राज्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे या समितीने केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाला अहवाल सादर केला आणि याच अहवालाच्या आधारे या मंत्रालयाने कांद्यावर ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी लावली.

टाॅप कमिटीकेंद्र सरकारने दाेन वर्षांपूर्वी टाॅप (टीओपी:- टी-टाेमॅटाे, ओ-ओनियन, पी-पाेटॅटाे) नामक एक कमिटी तयार केली आहे. ही कमिटी देशभरातील टाेमॅटाे, कांदा व बटाटा या तीन शेतमालाचे बाजारातील दर, दरातील चढ-उतार आणि ग्राहकांचे हित यांचे अध्ययन करून केंद्र सरकारला अहवाल सादर करीत असते. या समितीतील सदस्यांबाबत कुणालाही माहिती नाही. या समितीमध्ये केवळ आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश असून, शेतकरी, व्यापारी व इतरांचे प्रतिनिधी नाहीत, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

२५ टक्के कमी उत्पादनाचा अंदाजअति जाेरदार पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यातील कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जानेवारी २०२३ च्या तुलनेत जानेवारी २०२४ मध्ये कांद्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटणार असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या समितीने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

जानेवारी २०२४ मध्ये अधिक उत्पादनाची शक्यताकांद्याच्या दराने ४० रुपये प्रति किलाेची पातळी ओलांडताच नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली. साेलापूर व पुणे जिल्ह्यातील कांदा जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापासून तर नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्च २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येणार आहे.

खरीप कांदा अति नाशवंतसध्या खरीप कांदा बाजारात विक्रीला येत असून, हा कांदा अति नाशवंत आहे. हा कांदा शेतकऱ्यांसह व्यापारी व निर्यातदारांना अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे या कांद्याची बाजारातील आवक वाढली आहे. त्यातच निर्यातबंदीमुळे सरासरी प्रति किलाे १५ रुपयांनी दर काेसळल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

नाशिक जिल्ह्याची ‘माेनाेपॉली’ माेडीतलाल कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याची ‘माेनाेपॉली’ असल्याचे आजही मानले जाते. वास्तवात, ही ‘माेनाेपॉली’ पाच वर्षांपूर्वीच माेडीत निघाली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व कर्नाटकमध्ये लाल कांद्याचे मागील पाच वर्षांपासून माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मध्य प्रदेश व कर्नाटकमध्ये लाल कांद्याचे भरघोस उत्पादन झाले असताना, केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या तीन राज्यांमधील कांदा उत्पादनाकडे दुर्लक्ष करीत केवळ नाशिक जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :कांदाकेंद्र सरकारनाशिकराज्य सरकारशेतकरीपीकटोमॅटोबटाटाखरीपपाऊसपुणे