गोविंद शिंदे
उन्हाळा सुरू झाला असला तरी थंडी अजूनही जाणवत आहे, तर शिशिर ऋतू मावळून आता वसंत बहरायला सुरुवात झाली आहे. अशातच ठिकठिकाणी पळसाची फुलं रंग उधळताना दिसत आहेत.
पळस म्हणजे पलाश वृक्ष इंग्रजीत त्यास 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' असे म्हटले जाते. वसंत ऋतूत फुललेल्या पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नांदेड जिल्ह्याच्या बारूळ व पेठवडज परिसरात विविध मुख्य रस्त्यावर व माळावर पळसाचे झाड पाहण्यास मिळते.
माळावरती सर्वत्र पानझडी सुरू असताना मनाला थंडावा देणारे उल्हास निर्माण करणारे पळस फुले बहरली आहेत. पूर्वी रंगपंचमीसाठी रंग खेळायचा म्हणून या फुलांचा वापर केला जायचा.
केमिकल कलरमुळे वेगवेगळे त्वचारोग आणि त्रास होतो; तेव्हा पळस फुलांचा धूलिवंदन निमित्त वापर व्हायचा. पण आता पळस फुले पाहायला भेटत नसल्याने रंगसुद्धा तयार करता येत नाही.
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागातील बारूळ व पेठवडज परिसरातील बहुतांश गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. कधी पाऊस जेमतेम कधी अतिवृष्टी तर कधी पाण्यासाठी ठणठणात अशी परिस्थिती असते.
जमिनीचा पोत साधारण असल्यामुळे काटेरी झुडपे, बाभळी, कडुनिंब, बोर, पळस, साग, आंबा, सीताफळ यासह इतर निसर्ग दत्त वृक्षसंपदा कमी-अधिक प्रमाणात आहे.
लाल-पिवळा रंग वेधतोय सर्वांचे लक्ष
खरिपाचा हंगामानंतर उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारीअखेरपर्यंत शेत-शिवार ओसाड दिसायला लागते; पण सध्या या डोंगराळ भागात व मुख्य रस्त्यावरच पळस खुललेला पाहून मन प्रसन्न वाटत आहे.
हेही वाचा : नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली