केळी पीक विमा योजने अंतर्गत यंदा जळगाव जिल्ह्यातून विक्रमी १ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र, या विक्रमी नोंदणीत काही प्रमाणात बोगस विमा काढला असल्याची शक्यता कृषी विभाग आणि विमा कंपनीने वर्तवली आहे.
शेतात केळीची लागवड नसतानाही विमा काढल्याची शंका असल्याने, विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी पुन्हा सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यात कृषी आयुक्तालयाच्या पथकाने काही तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी मोहीम राबवली होती.
'एमआरसॅक' तंत्रज्ञानाचा घेणार आधार
• यंदाची पडताळणी ही केवळ कागदोपत्री नसून ती आधुनिक 'एमआरसॅक' उपग्रह तंत्रज्ञानाच्या आधारावर केली जाणार आहे.
• यामुळे ज्या शेतकऱ्यांनी शेतात प्रत्यक्षात केळी नसताना केवळ कागदोपत्री विमा भरला आहे, त्यांचे बिंग फुटणार आहे.
• तसेच, काही शेतकऱ्यांनी एकाच गटात ४ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर विमा काढल्याने संशय अधिक बळावला आहे.
यंदा अपात्रचा आकडा वाढणार
काही कारणास्तव थांबलेली ही मोहीम आता पुन्हा नव्याने सुरू केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. गेल्या हंगामात ५ ते ८ हजार शेतकरी अपात्र ठरले होते, मात्र यंदा हा आकडा दुपटीने म्हणजेच १० हजारांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभाग आक्रमक
• जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्याशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
• मात्र, कृषी विभागातील सूत्रांनुसार, खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळावा आणि सरकारी निधीचा अपव्यय थांबावा, यासाठी ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
• चुकीची माहिती देऊन विमा हप्ता भरणाऱ्यांचे विमा अर्ज बाद केले जाणार आहेत.
हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
