Join us

Nira Canal : सकाळी गळती थांबविणार होते, पहाटेच कॅनॉल फुटला; लाखो लिटर पाणी वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:52 IST

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील नीरा उजवा कॅनॉलवरील आठ मोरीवरील पुलाच्या दक्षिणेकडील भिंतीला भेग पडल्याने मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कॅनॉलला भगदाड पडले.

नातेपुते: माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील नीरा उजवा कॅनॉलवरील आठ मोरीवरील पुलाच्या दक्षिणेकडील भिंतीला भेग पडल्याने मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कॅनॉलला भगदाड पडले.

त्यामुळे लाखो लिटर पाणी कुसमोड, मळोली ओढबाला वाहून गेले आहे. या घटनेमुळे माळशिरस तालुक्यातील पिलीव, काळमवाडी, फळवणी, कोळेगावसहित सांगोला, पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

सध्या नीरा उजवा कॅनॉलचे उन्हाळी आवर्तन अंतिम टप्प्यात आले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही शेतीसाठीपाणी मिळाले नाही.

कॅनॉलचे पाणी बंद झाल्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे. खुडूस येथील ७७ चौकी व त्यावरील सर्व फाट्यांना पाणी सोडण्यात आले आहे.

सहा तासांत पाणी बंद होताच कामाची युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात येणार असल्याचे वेळापूरचे शाखा अभियंता दिनेश राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही पाहणी करून कॅनॉल तत्काळ दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या. या ठिकाणी फलटणचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी तात्काळ भेट देऊन अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.

सकाळी गळती थांबविणार होते, पहाटेच कॅनॉल फुटलासोमवारी कॅनॉलमधून पाणी जात असल्याचे समजल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची पाहणी करून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, तसेच मंगळवारी सकाळी काही कर्मचारी येथे काम करून संपूर्ण पाणी गळती बंद करणार होते. मंगळवारी पहाटे कॅनॉल फुटला.

ओढ्यालगतच्या नागरिकांना सतर्क राहावे. काम दहा दिवसांत करून सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न आहे. - दिनेश राऊत, शाखा अभियंता, वेळापूर

माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरात निरा उजवा कालवा अचानक फुटला. भर उन्हाळ्यात कालवा फुटल्याने पिलीवच्या खाली असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणे साहजिकच आहे. या विषयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून लवकरात लवकर काम पूर्ण करावे. - राम सातपुते, माजी आमदार

अधिक वाचा: उजनी धरणातून १२ मेच्या पुढे सीना नदीत पाणी सोडण्यात येणार; जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

टॅग्स :शेतीपाणीपाटबंधारे प्रकल्पसोलापूरशेतकरी