Nashik : कृषी क्षेत्रात शिक्षण घेत असताना नवीन नवीन कौशल्य अवगत करावेत. कृषी क्षेत्रात प्रचंड संधी आहेत." असे मत माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्ह्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्था मालेगाव अंतर्गत कृषी व फलोद्यान महाविद्यालयात दीक्षा आरंभ कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. ढगे यांनी कृषी क्षेत्राची स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर वाटचाल याची माहिती दिली. "परंपरागत शेती नंतर आधुनिक तंत्रज्ञानाची शेती व आज उच्चतंत्रज्ञानाची पहाट उगवली आहे. त्यामुळे आजच्या प्राप्त स्थितीत विद्यार्थ्यांनी हायटेक मधील वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिक्षण घेत असताना अवगत केल्यास त्यांचे भविष्य सोनेरी होईल. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी, नॅनो फर्टीलायझर्स, बायोटेक्नॉलॉजी यांचे वाचन व प्रत्यक्ष कृतिशीलता अंगीकारावी." असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. जगन्नाथ महाजन यांनी करून सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कृषी व फलोद्यान डॉ. चिंतामणी देवकर होते. अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर देवकर म्हणाले, दीक्षा आरंभ कार्यक्रम महाविद्यालयात कृषी विद्यापीठ अंतर्गत उत्साहात सुरू असून त्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील नामवंतांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत.
माजी कुलगुरू डॉक्टर ढगे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी गौरव उद्गार काढले. कार्यक्रमाला कृषी उपप्राचार्य डॉ. सतीश राऊत, फलोद्यान उपप्राचार्य डॉ. वैशाली पगार, प्रा. एस व्ही अहिरे व संस्थेचे रजिस्टार प्रणित पवार व सुमारे ३०० विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विश्वजीत ह्यालिज यांनी मानले.