सोलापूर : उपलब्ध मनुष्यबळ आणि जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अर्जामध्ये तब्बल तीनपट तफावत असल्याने जिल्ह्यात मोजणीसाठी कैक अर्ज येताहेत.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाने आधुनिक ५० रोव्हर मशिन्सची मागणी केली होती. सध्या या मशिन्स भूमिअभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध झाल्या आहेत.
या मशिन्सच्या साहाय्याने उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे जमिनीची अचूक मोजणी केली जाते. अवघ्या काही तासांत मोजणी प्रक्रिया पूर्ण होत असल्याने कामांना गती मिळू लागली आहे.
जिल्ह्यात एकूण १६ हजार ६२८ प्रकरणांपैकी ८ हजार ८०१ प्रकरणांची मोजणी पूर्ण झाली असून उर्वरित ७ हजार ८१३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.
ही प्रकरणेही जलदगतीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके यांनी दिली.
दरम्यान, राज्यभरात जमीन मोजणीची ३.१२ लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित असून यामुळे उद्योग, व्यवसाय आणि विविध विकासकामांची
सुरुवात खोळंबत आहे.
या पार्श्वभूमीवर मोजणी प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्ह्यांत खासगी प्रशिक्षित परवानाधारक भूमापक व भूमापन संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच प्रत्येक प्रकरण ३० दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सोलापुरात सध्या ६५ मोजणीदार कार्यरत असून नुकत्याच झालेल्या भरतीत ४ जणांची नियुक्ती झाली आहे.
मात्र, अर्जाच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे असल्याने वाढीव कर्मचाऱ्यांची गरज शासनाकडे मांडण्यात आली आहे.
पहिल्या आठवड्यात १० हजार प्रकरणे
◼️ मार्चअखेर जमीन मोजणीची ४ हजार २६४ प्रकरणे प्रलंबित होती.
◼️ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण सुमारे १० हजार प्रकरणे कार्यालयाकडे दाखल झाली.
◼️ याशिवाय चालू एप्रिल महिन्यात नव्याने १ हजार ३७० प्रकरणांची नोंद झाली आहे.
एकूण भूमिअभिलेख कार्यालयाकडे आजमितीस सुमारे १६ हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी मागील मार्चअखेरपर्यंत ७ हजार ७८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाली काढलेल्या प्रकरणांची संख्या वाढून ८ हजार ८०१ वर पोहोचली आहे. - दादासाहेब घोडके, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालय
