करमाळा : तालुक्यातील आदिनाथ सह. साखर कारखान्याकडे राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) या वित्तीय संस्थेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत ई-लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे.
२२ मे २०२६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ई-लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
श्री आदिनाथ सह. साखर कारखान्याकडे एनसीडीसीचे तब्बल ८५ कोटी १२ लाख ७५ हजार ४६४ रुपये इतके कर्ज थकीत आहे.
या थकबाकीच्या वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावासाठी काढण्यात आली आहे.
या लिलावामध्ये कारखान्याच्या ९५ हेक्टर ७४ आर क्षेत्रातील जमीन व त्यावरील सध्याच्या इमारती तसेच पुढे उभारण्यात येणाऱ्या स्थावर मालमत्तेचाही समावेश केला आहे.
साखर कारखाना, डिस्टिलरी, को- जनरेशन, वीज प्रकल्प, साखर मिल आणि संबंधित यंत्रसामग्रीचा लिलाव प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आला आहे.
आदिनाथ सह. साखर कारखान्यावर विद्यमान आमदार नारायण पाटील यांची सत्ता असून, त्यांनी साखर कारखाना ताब्यात घेण्यापूर्वीचे हे कर्ज आहे.
दरम्यान, आ. पाटील यांनी चॅलेंज स्वीकारून कारखाना ताब्यात घेतल्यानंतर ३० ऑक्टोबर २०२५ रोजी ई-लिलावाची पहिली नोटीस आली होती.
आता दुसऱ्यांदा लिलाव कारवाईची नोटीस आल्याने राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
करमाळा तालुक्यातील प्रकल्प व संस्था मोडकळीस याव्यात म्हणून काही लोक देव पाण्यात ठेवले असून, विखारी मानसिकता बाळगून ते फक्त राजकारण करत आहेत. या अगोदरच्या तारखेलाही बोभाटा केला होता. पण लिलाव झाला नाही. आताही तेच होणार आहे. - सुनील तळेकर, नारायण पाटील गट
अधिक वाचा: रेशनकार्डवरील रॉकेल वाटपाचा दर ठरला; प्रतिलिटर किती रुपयाने मिळणार रॉकेल?
