द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात असून यंदा माल कमी आहे. द्राक्ष निर्यात यंदा जवळपास २२ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० रुपये अधिक देऊन ग्राहकांना द्राक्ष खरेदी करावे लागत आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी खुश आहे.
हंगाम यावर्षी दोन आठवडे लवकर संपेल. वातावरणात होत असलेला सततचा बदल द्राक्ष बागांवर परिणाम करणारा ठरला. वातावरणात कधी कधी ढगाळ तर कधी कोरडेपणा असल्याने द्राक्ष दहा ते पंधरा दिवस अगोदरच पक्त होत राहिले. ते यावर्षी जवळपास दोन आठवडे लवकर बाजारात आले होते.
जगभरात नाशिकच्या द्राक्षांना मागणी जास्त असताना त्या तुलनेत मालाचा पुरवठा कमी असल्याने चार महिन्याच्या पूर्ण हंगामात दरात तेजी दिसून आली. रशिया, मलेशिया अन् संयुक्त अरब अमिरातीसाठी महिनाभरात शेवटचे किमान ४०० कंटेनर पुढच्या दहा ते पंधरा दिवसात रवाना होतील.
त्यासाठी बुकिंग करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षमालाचे खुडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले होते. त्यास प्रतिकिलो १२३ ते १३५ रुपयांदरम्यान दर मिळाला होता. कसमादे भागात प्रामुख्याने द्राक्ष उत्पादन घेतले.
नेदरलँडला सर्वाधिक निर्यात
• रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलैंड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकचे द्राक्ष निर्यात झाले. मात्र यंदादेखील सलग सहाव्या ते सातव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबईमार्गे समुद्री प्रवासाने पोहोचले आहेत.
• या देशात आताच्या हंगामातदेखील या एकट्या देशात १७०० हून अधिक कंटेनर रवाना झाले आहेत. त्या खालोखाल रशियाचा नंबर लागतो.
धग कमी, तरी फटका
• रशिया-युक्रेन युद्धाची धग काहीशी कमी झाली असली तरी त्याचा फटका निर्यातदारांना बसला आहे. युद्धामुळे द्राक्षांची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गे लांबचा पल्ला गाठून सुरू आहे.
• त्यामुळे कंटेनरचे भाडेही वाढले आहे. मागील काही वर्षांत दर आठवड्याला जहाजांची उपलब्धता असायची, मात्र आता ते पंधरा दिवसांत होतात.
याचाही काहीसा परिणाम
बांगलादेशाने प्रतिकिलो द्राक्षांसाठी लागू केलेले १०० रुपये आयात शुल्क हे कारणदेखील द्राक्ष निर्यातीवर परिणाम करणारे ठरले होते. त्यामुळे नाशिकसह देशभरातील द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले. याशिवाय समुद्री प्रवास महागला.
२०२४-२५ मध्ये निर्यात झालेले कंटेनर
४८७१ - युरोप खंड
१५०१ - नॉन युरोप
अशी झाली निर्यात
• २०२२-२३ मध्ये ६,७९६ कंटेनर द्वारे ९०,४९३ मे. टन.
• २०२३-२४ मध्ये ७,२९७ कंटेनर द्वारे ९८,३१९ मे. टन.
• २०२४-२५ मध्ये ६,३७२ कंटेनर द्वारे ८३,३११ मे. टन.