रंजित चिंचखेडे
भंडारा : पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करण्यात आली. ही बाब गावातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार दिली. चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली आहे.
शासन स्तरावरून दिले जाणारे अनुदान तत्काळ परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही नोटीस प्राप्त होताच शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. काही शेतकऱ्यांनी शासनाला निधी परत केल्याची माहिती देण्यात आली आहे.
गत सप्टेंबर महिन्यात पुराचे पाणी शिरले होते. महसूल विभागाने पूरग्रस्त शेती आणि धान पिकांचे सर्वेक्षण केले होते. राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत घोषित केली आहे. हेक्टरी आर्थिक मदत शेतकऱ्यांना डीबीटीअंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांचे बचत खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात येत आहे. ठसुकळी नकुल गावात पूरग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत प्रसिद्ध करण्यात आली नाही. ज्या शेतकऱ्यांचे शेत शिवारात दूरवर पुराचे पाणी पोहचले नाही.
अशा शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध यादीत आहेत. याशिवाय ज्यांचे नावे शेती नाही, अशा शेतकऱ्यांना ४८ हजार ६०० रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
गावातील यादीत आहे ३० ते ४० लाखांचा घोळ
• गावातील यादीत ३० ते ४० लाखांचा घोळ असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे तुमसर तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र तुरकर यांनी दिली होती.
• लेखी आणि तोंडी तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी चौकशी केली असता, धक्कादायक माहिती निदर्शनास आली. पूरग्रस्तांच्या यादीत गडबड असल्याचे दिसून आले आहे. अर्धेपेक्षा अधिक बोगस शेतकरी असल्याचे निदर्शनास आले आहे.
पती, पत्नी, सासू, सासरे यांना लागली लॉटरी
• एकाच कुटुंबातील पती, पत्नी, सासू आणि सासरे यांना प्रत्येकी ४८ हजार ६०० रुपयांची लॉटरी लागली आहे. हे शेतकरी गावातील शेतकरी नाहीत. मोठा घबाड करण्याचा प्रयत्न झाला आहे. ०.७७ आर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
• शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना लॉटरी लागली नाही, त्यांना मात्र फक्त आश्वासनांचे गाजर दाखविण्यात आले आहे. अशांना लाभ मिळणार की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बाहेर गावातील शेतकऱ्यांना अनुदान
सुकळी नकुल गावाच्या पूरग्रस्त यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे आली आहेत. त्यांच्या खात्यात अनुदान वळते करण्यात आले आहेत. ही नावे आली असल्याने संशय बळावला आहे. या शेतकऱ्यांना अनुदान परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुकळी नकुल येथील वंचित शेतकऱ्यांनी केली आहे.
माझी शेती नदीच्या पात्राच्या लगत आहे. गावाच्या दिशेने पुराची सुरुवात माझ्याच शेतीतून होते. संपूर्ण धानाचे पीक पुरात सडले होते, परंतु मदत तोडकी देण्यात आली आहे. नदीपासून ३०० मिटर अंतरावर पूर शिरले नसताना बोगस शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. दोषींवर कारवाई अन् वंचितांना न्याय मिळाले पाहिजे. - महेंद्र पारधी, नुकसानग्रस्त शेतकरी, सुकळी-नकुल जि. भंडारा.
हेही वाचा : शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं