बाळासाहेब माने
निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या दुष्काळामुळे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळले आहेत. 'भाऊसाहेब फुंडकर योजने' अंतर्गत गत चार वर्षात १ हजार ७७७ शेतकऱ्यांनी १ हजार १२२ हेक्टरवर आंबा, पेरू यासह इतर १६ फळांची लागवड केली आहे. शासनाच्या १०० टक्के अनुदानामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला शाश्वत आधार मिळत आहे.
महा डीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यामुळे शेती उत्पादनात मोठी वाढ होत आहे. गत काही वर्षांपासून धाराशिव जिल्ह्याला निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. कथी ओला दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.
यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून २०२२-२३ ते २०२५ २६ या आर्थिक वर्षात तब्बल १ हजार ७७७ शेतकऱ्यांनी १ हजार १२२ हेक्टरवर फळबाग योजनेतून आपली शेती फुलवली आहे.
पारंपरिक सोयाबीन, कापूस आणि ऊस या पिकांपलीकडे जाऊन फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जात असून, आंबा, पेरू आणि सीताफळ यांसह इतर फळझाडांची लागवड केली आहे. यामध्ये २०२३-२४ मध्ये सर्वाधिक ९७१ शेतकऱ्यांनी ६४४ हेक्टरवर विविध फळबागांची लागवड केली आहे.
तालुकानिहाय चार वर्षांतील फळबाग लागवड क्षेत्र (हेक्टर)
| तालुका | २०२२ | २०२३ | २०२४ | २०२५ |
| धाराशिव | २५ | १३९ | ३० | ४० |
| भूम | १९ | ९५ | ५८ | २७ |
| कळंब | ०४ | ४९ | १० | ०० |
| लोहारा | १७ | ३९ | ०२ | ०३ |
| परांडा | १४ | १३१ | ०७ | ०० |
| तुळजापूर | १४ | ९१ | ८९ | २३ |
| उमरगा | ०२ | ४२ | १६ | १४ |
| वाशी | ०२ | ५८ | ४३ | १६ |
लागवडीसाठी १०० टक्के मिळतेय अनुदान
• शासनाच्या 'भाऊसाहेब फुंडकर योजने' अंतर्गत आंबा, पेरू, संत्रा यासह १६ फळपिकांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. यात खड्डे खोदणे व रोपे खरेदीसाठी ३ वर्षांत ५०:३०:२० या टप्प्यात
• रक्कम थेट खात्यात जमा होते. इच्छुक शेतकऱ्यांनी 'महा डीबीटी' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून उत्पन्न वाढीच्या या संधीचा लाभघेतला आहे.
शेतकऱ्यांनी बाजारपेठेची मागणी ओळखून उत्पादन घेतले पाहिजे. कृषी विभागातील फळबागांच्या लागवडीसाठी उपलब्ध केलेल्या योजनेचा लाभ घेऊन समृद्धी साधावी. नगदी पिकाकडे वळल्यास अधिक नफा मिळवता येतो. -राजकुमार मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.
