अयोध्याप्रसाद गावकर
देवगड हापूसचा यावर्षीचा हंगाम १५ मे रोजीच संपला आहे. मोहोर जास्त; मात्र फळधारणा कमी झाल्यामुळे यावर्षीचे आंबा पीक गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्केच राहिले आहे. कमी उत्पादन असले तरी येथील बागायतदारांनी स्वतःचा माल स्वतःच विक्री केल्यामुळे चांगला भाव आंबा पेटीला मिळाला आहे.
देवगड हापूसचे यावर्षी उत्पादन ३० टक्केच राहिले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात देवगड तालुक्यातील एकूण आंबा कलमांपैकी सुमारे ७० टक्के कलमांना मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा कमी झाल्यामुळे यावर्षीच्या उत्पादनाला मोठा ब्रेक लागला आहे. यामुळे यावर्षीचे उत्पादन ३० टक्केच राहिले आहे.
मे महिन्यामध्ये फारच कमी आंबा बाजारपेठांमध्ये उपलब्ध होता. १५ मेनंतर देवगड हापूस आंब्याचे यावर्षीचे उत्पादन संपुष्टात आले असल्याचेच दिसून येत आहे. देवगड हापूस आंबा उत्पादनाचा कालावधी हा एप्रिल व मे महिन्यामध्ये असतो; मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच देवगड हापूस आंबा दुर्मीळ झाला.
त्यामुळे कमी उत्पादन असल्यामुळे सर्वसामान्यांना देवगड हापूस आंब्याची चव चाखता आलेली नाही. तालुक्यातील बहुतांश व्यापारी हे स्वतःच्या मालाची स्वतःच विक्री करतात. काही तालुक्यांतील बागायतदारांनी पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली व राज्यातील अनेक बाजारेपठांमध्ये स्टॉल उभारून आपल्या आंब्याची विक्री करीत होते.
पुण्यामध्ये देवगड हापूस आंब्याला ५०० ते ७०० रुपये प्रतिडझन भाव मिळत होता; मात्र वाशी मार्केटमध्ये दलालांची मक्तेदारी सुरूच राहिल्याने ते प्रति ५ डड़ानी पेटीला पंधराशे ते अठराशे रुपयांचा भाव देत होते; मात्र कोरोना विषाणूनंतर येथील बागायतदार हे स्वतःच्या मालाची स्वतःच विक्री करून आत्मनिर्भर बनले आहेत. यामुळे वाशी मार्केटमधील दलालांची पिळवणूक थांबली नाही तर भविष्यात वाशी मार्केटला देवगड हापूस आंबा मिळणे दुर्मीळ होईल.
गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्केच उत्पादन
• गतवर्षी देवगड हापूस आंब्याचे पीक है सुमारे ५० ते ६० टक्के होते. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये देवगड हापूस आंब्याचा हंगाम सुरू झाला तो मेअखेरपर्यंत सुरू होता. त्यामुळे सुमारे ५५ हजार ते ६० हजार मेट्रिक टन आंबा गतवर्षी असल्याची नोंद झाली होती. तर यावर्षी मात्र गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्केच उत्पादन असल्याचे बोलले जात आहे. काही आंबा बागायतदारांनी पुणे येथे १५० हून अधिक स्टॉल उभारले होते.
• असे असले तरी मात्र यावर्षी देवगड हापूसचे उत्पादन कमी असल्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली अन्य आंबा विक्री केला गेला. यामुळे बोगसरीत्या देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली अन्य राज्यांतील आंबा विक्री केला जात आहे. याला लगाम कधी लागणार? असा प्रश्न देखील दरवर्षी निर्माण होत आहे.
कॅनिंग आंब्याचा भाव कमी
सहा:स्थितीमध्ये देवगडमधील देवगड हापूस आंब्याला कॅनिंग देखील यावर्षी ४२ रुपये भाव शेवटपर्यंत होता. एप्रिलअखेरीस थोडा कॅनिंग आंब्याचा भाव कमी झाला होता. आता आंबा हंगामा संपल्यामुळे कॅनिंग सेंटर बंद करण्यात आले आहेत. तालुक्यातील मोठे कॅनिंग व्यापाऱ्यांनीच आपले कॅनिंग सेंटर सुरू ठेवले आहेत. यावर्षीचे देवगड हापूस आंब्याचे उत्पादन उत्कृष्ट जरी नसले तरी देखील थोड्याफार प्रमाणात समाधानकारक होते.
'आंबा बागायतदारांना मार्केटयार्डचा मोठा फायदा होईल'
• वाशी मार्केटमधील दलालांनी देवगड हापूस आंब्याला योग्य भाव दिला असता तर तालुक्यातील मोठ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला असता; मात्र दिवसाला १०० ते ३०० डझनी पेटी तोडणी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आंबा पिकवून विक्री करणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना वाशी मार्केटलाच आंबा पाठवावा लागतो. याचा फायदा दलालवर्ग घेऊन आंबा बागायतदारांची पिळवणूक करीत असतो.
• दलालांव्या विळाख्यातून मोठ्या बागायतदारांची सुटका होईल. त्याच वेळी या बागायतदारांना आपल्या मालाची योग्य किंमत मिळेल. नांदगाव येथे उभारण्यात येणारे मार्केटयार्ड येत्या दोन वर्षांमध्ये पूर्णत्वास येऊन देवगड हापूस आंबा बागायतदारांना याही मार्केटयार्डचा मोठा फायदा होणार आहे.
हेही वाचा : युरोपला केसरची तर आखाताला हापूसची भुरळ; भारतातून ५० देशांना होतो आंबा निर्यात