Pune : यंदा राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याचं सुतोवाच डॉ. रामचंद्र साबळे यांनी केलंय, त्यामुळे मला जरा बरं वाटतंय, राज्याचा कृषीमंत्री म्हणून मला यंदाच्या पावसाची चिंता होती पण आता त्यांच्या अंदाजाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होईल" असं मत राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३८ वा वर्धापन दिन आज पार पडला, यावेळी ते बोलत होते.
कृषीमंत्री भरणे म्हणाले की, "ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी आत्ताच आपल्या मनोगतामध्ये मॉन्सूनचा पाऊस चांगला होईल, असे सुतोवाच केलंय. शेतकऱ्यांसाठी ही बाब खरे ठरो यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. चांगल्या पावसावर शेतकऱ्यांनी पीके, फळबागाबाबतची स्वप्ने सत्यात उतरतात, अन्यथा पावसाअभावी नुकसान होते."
कृषी क्षेत्राला एआयची जोड देऊन जास्तीत जास्त शेतमाल उत्पादन झाल्यास आणि त्याला उत्तम बाजारपेठ मिळाल्यास शेतीसाठी भविष्यात आणखी चांगले दिवस येतील. त्यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशील शेती आणि आधुनिकीकरणाची कास धरून कृषी शिक्षणास प्राधान्य दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कष्ट, मेहनत, जिद्द आणि चिकाटीने काम केल्यास नक्कीच यश मिळतं असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी महाविद्यालयाने माजी विद्यार्थी संघटनेच्या इमारतीच्या बांधकामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागणी केली. त्यावर कृषीमंत्र्यांनी भर सभेत बोलताना हा प्रश्न कुलगुरूंना विचारला असता, पुढच्या दोन दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र देऊ असे कुलगुरुंनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "काम असे करूया की, इमारत उभी राहताना कुलगुरू आणि कृषीमंत्री कोण होते ही बाब लोकांच्या स्मरणात राहिली पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपण काम करू."
