परभणी : शेतात ये-जा करण्यासाठी शेतकऱ्यांची वाट सुकर व्हावी, यासाठी राज्य शासनाने २०२२-२३ या वर्षात मातोश्री पाणंद रस्ते योजना(Matoshri Panand Rasta Yojana) आणली.या योजनेअंतर्गत दोन वर्षांत परभणी जिल्ह्याला १ हजार ६६२ रस्त्यांना मंजुरी देण्यात आली.
त्यातील १४२१ रस्त्यांना कार्यारंभ आदेश मिळाला. मात्र, केवळ २८ रस्ते भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या पाणंद रस्त्यांची वाट नेमकी अडली कुठे? हे मात्र कळायला मार्ग नाही.
परभणी जिल्ह्यामध्ये ८० टक्के पेक्षा अधिक नागरिक शेती व्यवसाय करतात. ज्या शेतकऱ्यांना रस्ते, दळणवळणाची साधने सहज व सुकर उपलब्ध आहेत. त्या शेतकऱ्यांची आर्थिक सुबकता व परिस्थिती सुधारते, म्हणजेच रस्ते हे अर्थकारणाचे द्वार असल्याचे विविध संशोधन संस्था व भारत सरकार कृषी मंत्रालयाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात ये-जा करण्यासाठी पाणंद रस्ते, शिव रस्ते हे सुकर व्हावेत, यासाठी २०२२-२३ या वर्षात राज्य शासनाने मातोश्री पाणंद रस्ते योजना आणली. या योजनेअंतर्गत एका किलोमीटरसाठी जवळपास २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने १६६२ रस्ते आतापर्यंत जिल्ह्याला मंजूर केले आहेत. त्यातील १४२१ रस्त्यांना प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
मात्र, यातील केवळ ८६५ रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. विशेष म्हणजे त्यातील २८ रस्तेच भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे एका किलोमीटरसाठी जवळपास २५ लाख रुपयांचा निधी या पाणंद रस्त्यांसाठी शासनाकडून देण्यात येत असतानाही जिल्ह्यात या रस्ते योजनेची नेमकी वाट अडली कुठे? हे जिल्हा प्रशासनाने शोधणे गरजेचे आहे.
शिवरस्ते मोकळे करण्यासासाठी महिनाभराचा रोडमॅप
• शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता शिवरस्ते मोकळे नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात शेतकरी तहसीलदारांकडे अर्ज करतात. परंतु, तरी देखील त्यांना वेळेत रस्ता उपलब्ध होत नाही.
● त्यामुळे शेतकरी संबंधित कार्यालयास वेळोवेळी अर्ज करून हेलपाटे मारतात. हे सर्व थांबवण्यासाठी व शेतरस्ते मोकळे करून देण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी २ जानेवारी रोजी महिनाभराचा रोडमॅप तयार केला आहे.
● यामध्ये ६ जानेवारीपासून गावचे तलाठी यांनी ग्रामीण भागातील पायवाट असलेले गाव नकाशा प्राप्त करून घेण्यासह ८ फेब्रुवारी पर्यंत संबंधित रस्ता खुला करून देण्यापर्यंत कामाची आखणी करून देण्यात आली आहे.
● यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख व पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयातून ही कार्यवाही होणार असल्याचे २ जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
परभणी तालुक्यात सर्वाधिक १९५ कामे सुरू
* महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत परभणी तालुक्यात शासनाने ३१४ सर्वाधिक पाणंद रस्ते मंजूर केले आहेत.
* त्यातील २७५ रस्त्यांना प्रशासनाने कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यातील १९५ आहेत. त्या पाठोपाठ गंगाखेड ११, जिंतूर रस्त्यांची कामे सुरू १६३, मानवत १२८, पालम ७२, पाथरी ४२, पूर्णा १२९, सेलू ६७, तर सोनपेठ तालुक्यातील ३१ रस्त्यांची कामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.