सांगली : जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस, तासगाव, आटपाडी तालुक्यात रंगीबेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती, गुलाबासह अस्टर, जरबेरा यांसारखी फुले फुलली आहेत.
यंदा अतिवृष्टी व खराब हवामानामुळे फुलशेती खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असली, तरी नवीन वाणांचा प्रयोग व लागवडीत वाढ झाली आहे.
मात्र, रोगराईमुळे फुलांचे नुकसान झाल्याने यंदा बाजारभावात तेजी राहण्याची शक्यता फुले विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. फुलांना देशभरातील बाजारातून मागणी असल्याने देशभर नगरी फुलांचा सुगंध नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळीत दरवळणार आहे.
सुगंधित फुलांची मोठी मागणी असते. त्यात झेंडू व शेवंती चांगलीच भाव खाऊन जाते. नवरात्रोत्सव, दिवाळी सणासाठी फुलांचे मळे सज्ज झाले आहेत.
मिरज तालुक्यातील समडोळी, दुधगाव, तुंग, कवलापूर, आरग, बेडग, वाळवा तालुक्यातील आष्टा, बागणी, पलूस तालुक्यातील अंकलखोप, भिलवडी, वसगडे, आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, हिवतड, गोमेवाडी, तासगाव तालुक्यातील आरवडे, पुणदी आदी ठिकाणी सर्वांत जास्त फुलांचे उत्पादन घेतले जाते.
जिरायती जमीन व कमी पाण्यावर येणारी शेती म्हणून या भागात फुलशेती केली जाते. जिल्ह्यात जवळपास दोन हजार एकरवर झेंडू लागवड केली आहे.
शेवंतीत रतलाम, राजा, गोल्डन, पेपर व्हाइट, चांदणी, भाग्यश्री, पूजा व्हाइट, सानिया यलो, ऐश्वर्या, पोर्णिमा व्हाइट व यलो, सेंट व्हाइट, क्रिम व्हाइट यांसारखे शेवंतीचे प्रकार असून, त्यांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.
साधारण मार्चमध्ये शेवंतीची लागवड करण्यात येते. अतिवृष्टी व खराब हवामानामुळे बऱ्याच फुलांच्या मळ्यांचे नुकसान झाले आहे. यंदा लागवडीत थोडी वाढ झाली आहे.
नवीन वाणांचा प्रयोग वाढल्याने झेंडू फुलांच्या उत्पादनात वाढ झाली. मात्र, खराब हवामानामुळे फुलांचे नुकसान झाल्याने उत्पादन जेमतेम राहणार आहे.
...या फुलांची सर्वाधिक लागवडझेंडूमध्ये पिवळा, भगवा झेंडू, कलकत्ता, जम्बो, मारी गोल्ड, गोल्ड स्पोट, अष्टगंधा, पितांबरी यांसारख्या व्हरायटी आहेत. जिल्ह्यातील फुलांना दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, नागपूर, पुणे, मुंबई, बडोदा यांसारख्या मोठ्या मार्केटमधून मागणी होत आहे. यंदा कमी उत्पादनामुळे सणासुदीत भाव वाढणार असल्याची शक्यता आहे.
यंदा झेंडू-शेवंतीला सणासुदीत चांगला भाव राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. मात्र, पावसामुळे फुलांमध्ये ओलावा निर्माण होतो. त्याचा फुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन भाव कमी मिळण्याची भीती आहे. - बाळासाहेब पाटील, फूल उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा