Pune : राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढत असून मागील दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील मांजरा, सिंदफना, सिना आणि इतर लहानमोठ्या नद्यांना पूर आला आहे. घरे, दुकाने, शेती, पीके पाण्याखाली गेली असून जनावरेही वाहून गेली आहेत.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबरपर्यंत राज्यात १ हजार ६०१ मोठी जनावरे, १ हजार ७९९ लहान जनावरे आणि ५४ हजार ३३८ कोंबड्यांची जिवीतहानी झाली आहे. यासोबतच मराठवाड्यात आणि पूरग्रस्त भागांमध्ये जनावरांच्या मृत्युमुखी पडण्याचा आकडा वाढत असून मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी होत आहे. पण एनडीआरएफकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे पशुधनाच्या मरतुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे निकष पाहिले तर, दुधाळ जनावरे, ओढकाम करणारे व वाहतुकीसाठी उपयोगात येणाऱ्या जनावरांसाठी नुकसान भरपाई देण्यात येते. पण यासाठी मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत.
म्हैस, गाय किंवा उंट या जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये प्रती जनावर एवढी भरपाई देण्यात येते पण भरपाईची मर्यादा केवळ ३ जनावरांची आहे. यासोबत शेळी, मेंढी आणि वराह साठी प्रती जनावर ४ हजारांची भरपाई असून जास्तीत जास्त ३० जनावरांची मर्यादा आहे. बैल, अश्व, उंट यांसाठी ३२ हजारांची भरपाई असून जास्तीत जास्त ३ जनावरांची भरपाई देण्यात येते.
वासरे, गाढव, शिंगरू, खेचरे व कालवडीसाठी प्रती जनावर २० हजारांची नुकसान भरपाई देण्यात येत असून जास्तीत जास्त ६ जनावरांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. तर कुक्कुपालनातील १०० कोंबड्यांसाठी प्रती कोंबडी १०० रूपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येते.
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे ३ पेक्षा जास्त जनावरे वाहून गेले असल्यामुळे आणि प्रती जनावर मिळणारी मदतही कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना या निकषाप्रमाणे मदत मिळाल्यावर तोटा सहन करावा लागणार आहे.