Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहरी हवामानामुळे आंबा 'भुरी' रोगाच्या विळख्यात; आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:18 IST

गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने रंग बदलला असून, अचानक आलेल्या ढगाळ हवामानामुळे या सुखाला दृष्ट लागली आहे. या लहरी हवामानामुळे आंब्यावर 'भुरी' रोगाचे संकट ओढवले असून, हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे.

या वर्षी निसर्गाच्या साथीने आंबा बागा मोहोराने अक्षरशः न्हाऊन निघाल्या आहेत. गावरान असो वा केशर, झाडाच्या प्रत्येक फांदीवर डोलणारा बहर पाहून बळीराजा सुखावला होता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने पुन्हा एकदा रंग बदलला असून, अचानक आलेल्या ढगाळ हवामानामुळे या सुखाला दृष्ट लागली आहे. या लहरी हवामानामुळे आंब्यावर 'भुरी' रोगाचे संकट ओढवले असून, हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे.

मोहोराचा बहर, पण अस्मानी संकट

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील म्हसदीसह ककाणी, भडगाव, राजबाई शेवाळी, काळगाव, धमनार, वसमार, दातर्ती, चिंचखेडे, अक्कलपाडा आणि तामसवाडी भागांत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केशर आंब्याच्या बागा जोपासल्या आहेत. यंदा थंडी दीर्घकाळ टिकल्याने मोहोरही भरघोस आला.

मात्र, उशिरा झालेली फळधारणा आणि त्यातच सोबतीला आलेले ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आंब्यावर 'भुरी' रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पांढरट रंगाच्या या रोगामुळे मौल्यवान मोहर काळवंडून गळून पडत आहे. या परिस्थितीमुळे स्थानिक बागायतदार हवालदिल झाले आहेत.

फवारणीचा खर्च वाढला; मात्र, उत्पादनात येणार घट

• निसर्गाच्या या लहरीपणामुळे आता औषध फवारणीचा खर्च वाढला असून, उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने म्हसदी परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

• या संकटावर उपाययोजना सुचवताना अनुभवी फळबाग उत्पादक श्याम देवरे म्हणाले की, 'या वर्षी थंडीमुळे फळधारणा उशिरा होत आहे. त्यात ढगाळ हवामानामुळे 'भुरी'चा धोका वाढला आहे. शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी ८० टक्के पाणीमिश्रित गंधक किंवा कार्बनडाझिमची (१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) तातडीने फवारणी करणे गरजेचे आहे.

• आम्ही रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून या बागा जगवल्या. यंदा मोहोर चांगला असल्याने मोठी आशा होती; पण निसर्गाच्या लहरीपणामुळे डोळ्यांदेखत मोहर गळताना पाहून काळजात धस्स होत आहे. आता बागा वाचवायच्या कशा, हाच प्रश्न समोर आहे., अशी भावना स्थानिक बागायतदार व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Erratic Weather Causes Mango 'Bhurshi' Disease, Farmers Anxious

Web Summary : Unseasonal cloudy weather has led to 'Bhurshi' disease affecting mango crops in Dhule district. Farmers face potential losses despite initial good flowering. Increased spraying costs and anticipated reduced yields are causing financial distress. Experts advise immediate fungicide application to salvage the crop.
टॅग्स :आंबाशेती क्षेत्रशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनफळेफलोत्पादनहवामान अंदाज