Join us

Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीच्या कामात महिला शक्ती अग्रेसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:18 IST

Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार ६८१ महिला ऊसतोडणी, भरणीचे काम करीत आहेत. ते कुटुंबासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून २३ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत हे काम करीत आहेत.

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : जिल्ह्यात ८ हजार ६८१ महिलाऊस तोडणी, भरणीचे काम करीत आहेत. ते कुटुंबासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून २३ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत हे काम करीत आहेत. यामध्ये १२० गर्भवतीही पोटात बाळ घेऊन कष्टाचे काम करीत आहेत.

याशिवाय मजुरांच्या कुटुंबासोबत पाच वर्षांच्या आतील १७१२ बालके आहेत. ते आई, वडिलांच्या उघड्यावरील संसारात भविष्याचा वेध घेत आहेत. आरोग्य प्रशासनाने यांच्या आरोग्यासाठी प्रत्येक कारखाना कार्यस्थळावरून आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालतून ही आकडेवारी समोर आली आहे.

मराठवाड्यात बीड, परळी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आदी ठिकाणांहून २१ हजार २२८ ऊसतोडणी मजूर पत्नी, मुलांसह दाखल झाले आहेत. ते कारखाना कार्यस्थळावर आणि ऊस पट्टयात पालाची झोपडी मारून राहिले आहेत.

दिवसभर ऊसतोडणी, भरणीचे काम ते करतात. त्यांच्यासोबत पत्नी, मुलेही आहेत. मुले, मजुरांची हिवताप, इतर साथीच्या आजारांची तपासणी केली जात आहे; गरिबीसमोर हतबल असल्याने शेकडो किलोमीटर लांब येऊन ऊन, वारा, थंडीतही ऊसतोडणीचे काम करीत आहेत.

कारखान्यांचे दुर्लक्षहंगामाच्या सुरुवातीलाच आरोग्य प्रशासनाने प्रत्येक कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून मजुरांच्या आरोग्याची काळजी, सेवा, सुविधा द्या आणि त्याचा अहवाल आठ दिवसांतून एकदा पाठवा, असे लेखी कळवले. मात्र, एकाही कारखान्याने यासंबंधीचा अहवाल दिला नाही म्हणून आरोग्य विभाग आपल्या मार्फत आरोग्य सुविधा पुरवत आहे.

१२० गर्भवती मजूरमजुरांसोबतच्या महिला स्वयंपाक करून ऊसतोडणी, भरणीचे काम करीत आहेत. त्यामध्ये १२० गर्भवतीही आहेत. शरीराला विश्रांतीच्या कालखंडातही गरिबीमुळे त्याही तोडणी, भरणीच्या कामात मदत करतात. त्यांच्यापर्यंत शासकीय आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे. त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा दिली जात आहे.

दृष्टिक्षेपातील मजूरऊसतोडणी मजूर टोळ्या : २,५२०एकूण मजूर : २१,२२८पुरुष : ११,७५९महिला : ८,६८१मुले : ९०७मुली : ८०५

ऊसतोडणी मजुरांना आरोग्य विभागाच्यावतीने काही सुविधा पुरवल्या जात आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. हंगामाच्या काळात त्यांच्यात कोणत्याही प्रकारच्या साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, याकडेही विशेष लक्ष दिले आहे. - डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :ऊससाखर कारखानेकोल्हापूरमहिलाकामगारआरोग्यमराठवाडा