जळगाव जामोद : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी कृषी विभागाने विकसित केलेले 'महाविस्तार' अॅप अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी शासनाने व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल शेतीकडे वळवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने तालुक्यातही जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
२० टक्के शेतकरी अॅपशी जोडण्याचे उद्दिष्ट
राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान २० टक्के शेतकऱ्यांनी महाविस्तार अॅप डाउनलोड करून नियमित वापर करावा, असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेची प्रगती समयोचित बैठक्यांमध्ये तपासली जाणार असून, प्रत्येक अधिकाऱ्यावर अॅप स्वीकारण्याचा दर वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी अपर मुख्य सचिव (कृषी) यांनी जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा घेतला असून, जिल्हाधिकारी व कृषी विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
स्मार्ट शेतीकडे वाटचाल
महाविस्तार अॅपमुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जात असून, निर्णयप्रक्रिया सुधारते. पिकांची उत्पादनक्षमता वाढते. खर्च कमी होऊन नफा वाढतो. कृषी विभागाच्या या मोहिमेमुळे अधिकाधिक शेतकरी स्मार्ट शेतीकडे वळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विशेष उपक्रम
कृषी विभागाने जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना जनजागृती उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये गावागावांमध्ये प्रात्यक्षिके, प्रशिक्षण शिबिरे आणि जनजागृती मोहिमा, कृषी सेवा केंद्र, कृषी सखी व कृषीताईमार्फत शेतकरी गटांना मार्गदर्शन, स्थानिक वृत्तपत्रांत माहितीपर लेख, मालिका व यशोगाथा प्रसिद्ध करणे या उपक्रमांचा समावेश आहे.
महाविस्तार अॅप हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे डिजिटल साधन आहे. राज्य शासनाने दिलेले २० टक्के शेतकरी अॅपशी जोडण्याचे उद्दिष्ट आम्ही गांभीर्याने घेतले असून गावागावांत जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
- रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी.
