Join us

राज्यातील मका उत्पादकांना यंदा लागली मुरघासाची ओढ; धान्य उत्पादन घटणार का?

By रविंद्र जाधव | Updated: August 26, 2025 22:56 IST

सध्या राज्यातील विविध भागांमध्ये मका पीक मुरघासासाठी योग्य अवस्थेत असून अनेक शेतकरी या पिकास थेट मुरघासासाठी देण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. (Maize crop status in Maharashtra 2025)

दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या आणि उच्च दूध उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या चाऱ्यांपैकी एक म्हणजे मुरघास. सध्या राज्यातील विविध भागांमध्ये मका पीक मुरघासासाठी योग्य अवस्थेत असून अनेक शेतकरी या पिकास थेट मुरघासासाठी देण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.

यंदा मान्सून वेळेवर दाखल झाल्याने राज्यभर खरीप लागवडी वेळेत पूर्ण झाल्या. गतवर्षी सरतेशेवटी कपाशी, सोयाबीन व काही प्रमाणात तुरीला बाजारात कमी भावांचा फटका बसल्याने यंदा शेतकऱ्यांनी मका पिकाला अधिक पसंती दिली. परिणामी मुरघास निर्मितीसाठी लागणाऱ्या मका पिकाची उपलब्धता वाढली आहे.

दरम्यान राज्यात मुरघास तयार करून विक्री करणारे शेतीपूरक व्यवसायिक यंदा वाढत्या मागणीचा विचार करून अधिक प्रमाणात मुरघास निर्मिती करत आहेत. ज्यात 'बॅरल' पद्धतीत मुरघास तयार केला जात असून तो मागणीनुसार विविध भागांत पोहोचविण्यात येतो.

धान्यापेक्षा मुरघास अधिक फायदेशीर?

• सध्या सर्वत्र मका पीक दाणा भरणी अवस्थेत आहे. पीक काढणीस सुमारे एक महिना असतानाच अनेक शेतकरी मक्का थेट मुरघासासाठी विकत आहेत. मका सोंगणी, मळणी, वाहतूक असा धान्य विक्रीसाठी लागणारा खर्च वाचतो शिवाय जागेवर मोबदला मिळतो.

• त्यामुळे शेतकरी कोणतेही अधिक श्रम न करता पीक मुरघासासाठी देताना दिसून येत आहेत.

• वाढलेली मजुरी, मजुरांची उपलब्धता नसणे तसेच बाजारातील अनिश्चितता या सर्व घटकांचा विचार करता धान्याच्या तुलनेत मुरघास हा पर्याय शेतकऱ्यांसाठी अधिक सोयीचा व फायदेशीर ठरतो आहे.

धान्यासाठी मका काढणीचा खर्च (प्रती एकरी)

  • सोंगणी प्रती एकरी : १० ते १२ हजार रुपये. 

  • मळणी प्रती क्विंटल : ८०-१२० रुपये.  

  • वाहतूक (आंतरनिहाय) : २ हजार ते ४ हजार रुपये.  

  • प्रति एकरी सरासरी उत्पादन : १०-१५ क्विंटल.

  • त्यानुसार प्रति एकर खर्च : १२००० ते १५००० रुपये.

राज्यातील आजचे मका बाजारदर

२००० ते २२०० रुपये सरासरी प्रती क्विंटल. (कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार). 

मुरघासासाठी दिल्यास उत्पन्न किती?

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण परिसरात सध्या मुरघासाचा दर २००० ते ₹२५०० प्रति टन आहे. चांगली वाढ असलेल्या मका पिकातून एका एकरातून २२ ते २५ टन मुरघास मिळतो. त्यानुसार एकरी ४५,००० ते ५०,००० पर्यंतचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते.

रब्बी हंगामाची आशा.. 

गेल्या दोन वर्षांत दिवाळी दरम्यान पावसाची साथ लाभली असून यंदाही अशीच स्थिती निर्माण झाल्यास रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी व हरभरा या पिकांची लागवड वेळेत होऊन अतिरिक्त पाणी न देता पीक हाती येणे शक्य होईल. त्यामुळे अनेक शेतकरी मका धान्यासाठी न काढता थेट मुरघासासाठी देण्याच्या निर्णयाकडे वळत आहेत.

यंदा दर अधिक? 

दरम्यान यामुळे धान्य उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बाजारात पुरवठा कमी झाल्यास दर वाढू शकतात अशी शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याचा मुलाने उभारला कोट्यवधींचा उद्योग; प्रसंगी आईचं मंगळसूत्र गहाण ठेवलेल्या तरुणाची वाचा यशोगाथा

टॅग्स :मकाशेती क्षेत्रशेतकरीशेतीदुग्धव्यवसायबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड