महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. शेतकरी कल्याण, शेती विकास आणि कृषी शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस राज्यभर विविध कार्यक्रमांद्वारे पाळला जातो.
वसंतराव नाईक यांनी मर्यादित साधनसंपत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही महाराष्ट्राच्या शेतीला आधुनिकतेकडे नेले. तसेच त्यांनी 'शेती आणि शेतकरी' या विषयाला नेहमी प्राधान्य दिले. कृषी विद्यापीठांची स्थापना, शेतकऱ्यांना उत्तम बियाण्यांचा पुरवठा आणि धान्याच्या टंचाईवर उपाय अशा विविध उपाययोजना त्यांनी यशस्वीरित्या राबवल्या.
१९७२ मधील मोठ्या दुष्काळाचा सामना करताना त्यांनी केवळ तात्पुरते नव्हे तर शाश्वत दुष्काळ निवारणाचे मार्ग तयार केले. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित न राहता आजही मार्गदर्शक ठरत आहे.
कृषीसंस्कृतीचा गौरव करणारा दिवस 'कृषी दिन'
'कृषी दिन' हा केवळ एक स्मरण दिन नसून, तो भारतीय कृषीसंस्कृतीचा गौरव करणारा दिवस आहे, अशी भावना विविध स्तरांवरून व्यक्त होत आहे. नव्या पिढीला शेतीकडे आकर्षित करणारा, पारंपरिक आणि आधुनिक शेतीत सेतू घालणारा दिवस म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.