कृषी विभाग व पंचायत समिती नांदगाव (जि. नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह नांदगाव येथे हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.०१) रोजी 'महाराष्ट्र कृषी दिन' साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव पी. एस. पाठक होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका अध्यक्ष अँग्रो डीलर असोसिएशन नांदगाव बाळासाहेब कवडे, तालुका कृषी अधिकारी नांदगाव रविंद्र डमाळे, कृषि अधिकारी नांदगाव झोळे, कृषि अधिकारी पंचायत समिती सुरेश चौधरी, कृषि विस्तार अधिकारी पंचायत समिती भट्टू वाघ, बाणेश्वर ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष विजू हेंबाडे, प्रगतिशील शेतकरी व कांदा उत्पादक साठवणूक तंत्रज्ञान क्षेत्रातील सुभाष जाधव, तसेच प्रगतशील शेतकरी त्र्यंबक नांगरे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभारी मंडळ कृषी अधिकारी नांदगाव वैजनाथ राठोड यांनी केले. तसेच त्यांनी हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या उल्लेखनीय कार्यावर सखोल मार्गदर्शन केले.
यानंतर तालुका कृषी अधिकारी रविंद्र डमाळे यांनी नांदगाव तालुक्यातील खरीप हंगामातील पिकपेरणीची माहिती, सध्याची पीक परिस्थिती आणि मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणाबाबत सविस्तर कृषि सल्ला दिला. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कृषी दिनानिमित्त बाळासाहेब कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांबाबत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आपले विचार मांडले. या कार्यक्रमात खरीप हंगामात कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची नोंद 'महाकृषी' अॅपमध्ये केल्याबद्दल त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मका पिक स्पर्धा कार्यक्रमांतर्गत विजेते ठरलेले शेतकरी त्र्यंबक नांगरे व सुभाष जाधव यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय उत्कृष्ट पद्धतीने सेंद्रिय शेती करणारे विजू हेंबाडे आणि रेशीम शेती करणारे युवा उद्योजक महेश शेवाळे यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि महिलांचे आभार कृषि विस्तार अधिकारी भट्टू वाघ यांनी मानले. अध्यक्ष पी. एस. पाठक यांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा एस. टी. कर्नर आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.