अशोक कांबळे
मोहोळ : घर आणि शेत राखण्यासाठी शेतकरी ज्या कुत्रा पाळतात. पाळलेला कुत्रा सावलीप्रमाणे कायम शेतकऱ्यासोबत राहतो. कुत्र्याची इमानदारी अनेकवेळा दिसली आहे.
मोहोळ तालुक्यातील वडवळच्या एका शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. स्मशानभूमीत शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी मागील दिवसांपासून कुत्रा बसून आहे. यावरून कुत्र्याचे मालकावर असलेले प्रेम स्पष्ट होत आहे.
एखाद्या घरमालकाने कुत्र्याला जीव लावला तर जिवाच्या पलीकडेही तो कुत्रा प्रामाणिकपणे काम करतो. याचा प्रत्यय नुकताच येथील वडवळ येथे अनुभवण्यास मिळाला.
वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे. पत्नी, मुलासह वस्तीवर राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने ७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.
तानाजी पवार यांच्या परिवारासह नातेवाइकांनी शोक व्यक्त करीत त्यांच्या पार्थिवाचे वडवळ येथील स्मशानभूमीत दहन दिले.
परंतु, माणसापेक्षाही जिवाला जीव लावणारा तानाजी पवार यांचा कुत्रा मालकाला दहन दिल्यापासून नऊ दिवस झाले त्या स्मशानभूमीतच बसून आहे. हे चित्र पाहताना वडवळ येथील नागरिकांच्या तोंडून या मुक्या प्राण्याविषयी कौतुकाचे शब्द काढले जात आहेत.
तानाजी पवार यांच्या पार्थिवाचे ज्या ठिकाणी दहन करण्यात आले, त्या दिवसांपासून कुत्रा स्मशानभूमीतच आहे. काहींनी त्या कुत्र्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो स्मशानभूमीतच राहून बसत आहे. नऊ दिवसांपासून कुत्रा स्मशानभूमीतच आहे. तानाजी यांचाही त्या कुत्र्यावर प्रचंड जीव होता. - शाहू धनवे, अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ, वडवळ
अधिक वाचा: राज्यातील 'या' ६ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४८० कोटी देण्यास मान्यता; मदत वाटप सुरू