आपल्याकडे अशी अनेक झाडे आहेत, त्यांचा वापर आपण वेगवेगळ्या सणांमध्ये करतो. रंगपंचमीला 'शेंदरी' या झाडापासून रंग तयार केला जात असे. पण आता हे झाड दुर्मिळ झाले आहे. कारण त्याची माहितीदेखील शहरातील लोकांना नसते. त्याबाबत माहिती करून घेऊ.
सध्या अनेक ठिकाणी शेंदरी हे झाड फुलले आहे. शेंदरी हे नैसर्गिक खाद्यरंगाचे झाड आहे. याचा वापर परंपरागतरीत्या शेंदरी रंगासाठी खाद्यपदार्थांमध्ये करण्यात येतो.
पूर्वीच्या काळी जिलेबी, शिरा किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये शेंदरी रंग हवा असेल तर या झाडाच्या बियांचा वापर केला जात असे. या झाडापासून नैसर्गिक रंग मिळत असल्याने त्याचा वापर लिपस्टिकसाठी देखील केला जातो. त्यामुळेच काही देशांमध्ये याला 'लिपस्टिक ट्री' असेही नाव आहे.
या झाडाची फुले अतिशय सुंदर असतात. त्यावर मधमाशा परागीभवनासाठी येतात. नैसर्गिक शेंदूरदेखील याच झाडापासून तयार करण्यात येतो. आपल्याकडे हनुमानाला शेंदूर लावण्याची परंपरा आहे. तो जो रंग असतो तो याच झाडापासून केला जातो.
तसेच कातडे कमावणाऱ्या व्यवसायामध्ये याच्या सालीचा वापर करण्यात येतो. पूर्वीच्या काळी स्त्रिया सिंदूरसाठी या झाडाचा वापर करायच्या. या झाडाला म्हणून 'कुंकुम वृक्ष' म्हणून ओळखले जाते. यातील बियांना चोळले की, रंग हातावर उमटतो. या बियांचा रंग हा अजिबात विषारी नसतो. तो खाण्यायोग्य आहे.
कार्लोस लिनायस या शास्त्रज्ञाने या वनस्पतीला 'Bixa Orellana' असे नाव दिले. हे मध्य अमेरिकेतील मूळचे झुडूप किंवा लहान झाड आहे. कॅरेबियन बेटाच्या मध्ये पुरातन संस्कृती होऊन गेली. ती टियाना संस्कृती होती.
ते लोक या वनस्पतीला 'बिक्स' असे म्हणायचे आणि सणाला या बियांचा रंग स्वतःच्या अंगाला लावायचे. त्यामुळे त्याला 'बिक्सा' असे नाव दिले, तर 'ओरेलिना' हे नाव यासाठी की, त्या नावाचा एक संशोधक होता. तो अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात भटकंती करायचा. त्याने संशोधनाचे काम केले, म्हणून त्याचे नाव 'बिक्सा ओरेलिना' असे नाव या झाडाला दिले.
पाऊस प्रदेश पुरक
ही वनस्पती मध्यम आकाराची आणि सदाहरित आहे. कमी पावसाच्या प्रदेशात वाढते. सिंदूर, शेंदरी, बिक्सा, लिपस्टिक ट्री अशी नावे आहेत. गुच्छामध्ये गुलाबी फळं येतात. त्यामध्ये बिया असतात. फळावर काटेरी आकार असतो. पण ते काटे नसतात तर त्यात मऊपणा असतो. शेंदूर रंग यापासून मिळतो.
- डॉ. श्रीनाथ कवडे
वनस्पतीतज्ज्ञ, पुणे