बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताण, अयोग्य आहारपद्धती आणि व्यायामाचा अभाव यामुळे राज्यात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
कामाचा ताण, अनियमित झोप, फास्ट फूडचे वाढते सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
आरोग्य विभागाच्या असंसर्गजन्य रोग विशेष तपासणीच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये हृदयविकार, पक्षाघात, फुफ्फुसांचे विकार आणि किडनीच्या आजारात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
काय आहेत कारणे?
• तेळकट व जंक फूडचे वाढते सेवन.
• व्यायामाचा अभाव, कमी हालचाल.
• धूम्रपान आणि मद्यपान.
• मानसिक ताण व तणावपूर्ण जीवनशैली.
• झोपेचा अभाव आणि अनियमित दिनक्रम.
• लठ्ठपणा व वाढलेले कोलेस्टेरॉल.
या आजारांचे प्रमाण वाढतेय
• हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार : ५५ टक्क्यांनी वाढ
• मधुमेह : रुग्णसंख्येत सातत्याने वाढ
• पक्षाघात : ८४ टक्क्यांनी वाढ
• सीओपीडी (फुफ्फुसांचे दीर्घकालीन विकार) : ६२.४ टक्क्यांनी वाढ
• किडनी विकार : ४९.८ टक्क्यांनी वाढ
• कर्करोग : तपासणीत नव्या रुग्णांची नोंद वाढती.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
• असंसर्गजन्य आजारांची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार थकवा येणे, चक्कर येणे किंवा लघवीत बदल दिसणे, ही काही महत्त्वाची लक्षणे आहेत. अनेकदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
• मात्र, ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेत उपचार केल्यास गंभीर परिणाम टाळता येतात.
असंसर्गजन्य आजार म्हणजे काय?
• असंसर्गजन्य आजार म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे न पसरता दीर्घकाळ शरीरावर परिणाम करणारे आजार होय. हे आजार प्रामुख्याने जीवनशैली, आहार, अनुवांशिकता आणि पर्यावरणीय कारणांमुळे होतात.
• मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, फुफ्फुसांचे विकार आणि किडनीचे आजार हे असंसर्गजन्य आजारांच्या गटात मोडतात. हे आजार हळूहळू वाढतात आणि सुरुवातीला त्यांची लक्षणे फारशी जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे पोहोचतो.
आरोग्याकडेही पाहायला वेळ नाही
आधुनिक जीवनशैलीमध्ये अनेकजण कामाच्या व्यापात इतके गुंतलेले असतात की, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. दीर्घकाळ बसून काम करणे, अनियमित जेवण आणि झोपेचा अभाव यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
