Join us

Leopard Attack : बिबट्याचे वाढते हल्ले रोखायचे तरी कसे? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:05 IST

leopard attack ग्रामीण तसेच अर्धशहरी भागांमध्ये माणसांवर किंवा पाळीव जनावरांवर bibtya बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे.

ग्रामीण तसेच अर्धशहरी भागांमध्ये माणसांवर किंवा पाळीव जनावरांवर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे.

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष हे शतकानुशतके चालत आलेले वास्तव असले तरी अलीकडील काळात बिबट्याचे हल्ले वाढण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव, दौंड या तालुक्यात बिबट्याच्या मानव आणि जनावरांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या समस्येकडे केवळ संवेदनशीलतेने नव्हे तर ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

का होतात हल्ले?◼️ जंगलतोड, शहरीकरण, रस्ते आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे बिबट्याचे नैसर्गिक अधिवास कमी झाले आहेत. त्यामुळे अन्नसाखळी बिघडून बिबट्यांना मानवी वस्तीकडे वळावे लागते.◼️ जंगलात हरीण, साळींदर, रानडुक्कर यांसारख्या प्रजातींच्या संख्येत घट झाल्यामुळे बिबट्याला भूक भागवण्यासाठी पाळीव जनावरे व लहान मुले ही सहज उपलब्ध शिकार वाटू लागतात.◼️ शहरीकरणामुळे झपाट्याने वाढणारे सिमेंट-कॉक्रीटचे जंगल, वाढती लोकसंख्या यांमुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही. परिणामी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढून बिबट्या त्याकडे आकर्षित होतो.◼️ मोबाईल, बॅटरी, विजेच्या दिव्यांमुळे रात्री उशिरापर्यंत आपली कामे सुरूच असतात आणि बिबट्या रात्री जास्त सक्रिय असल्याने हल्ला होण्याच्या घटना वाढत आहे.

काय उपाय करावे?◼️ नैसर्गिक अधिवासाचे जतन व पुनरुज्जीवन, झाडांची लागवड, जंगल क्षेत्रात वाढ, अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई, जैवविविधता टिकवण्यासाठी विशेष योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.◼️ मानव-वन्यजीव संघर्ष निवारणासाठी प्रत्येक तालुकास्तरावर वन विभागाची तात्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा असावी.◼️ बिबट्याच्या हालचालींची माहिती मिळताच पिंजऱ्यांची व्यवस्था, सीसीटीव्ही, ट्रॅप कॅमेरे लावणे ही कामे त्वरीत केली जावीत.◼️ ग्रामस्थांना बिबट्याच्या सवयी, त्याच्या हालचाली ओळखण्याचे प्रशिक्षण देणे, तसेच रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगणे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी.◼️ पाळीव जनावरांसाठी सुरक्षित जागेची व्यवस्था, ऊस शेती परिसरात मजबूत बंदिस्त गोठे तसेच संरक्षित कुंपण आवश्यक आहे.◼️ गावातील सीमाभागांवर सौरदिवे, पथदिवे बसवणे आणि वन विभागाच्या मदतीने स्वयंसेवी गस्त पथक तयार करणे उपयोगी ठरेल.◼️ वस्तीत येणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करून पुनर्वसन करावे.◼️ त्यांचे इयर टॅगिंग करून पुनर्वसन केलेल्या ठिकाणाची माहिती ग्रामस्थांना देणे अधिक प्रभावी ठरू शकते.

- आकाश हरिभाऊ भोरडे

अधिक वाचा: भविष्यात तुमच्या विहिरीला पाणी कमी पडू नये म्हणून शेतकऱ्यांनो आत्ताच हे काम करा

टॅग्स :बिबट्याशेतकरीशेतीपुणेआंबेगावजंगलवन्यजीववनविभाग