Leopard Attack : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शिरूर-पुणे भागात बिबट्या मानव संघर्ष वाढला आहे. मागील १५ दिवसांत ३ जणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मागच्या काही वर्षात मानव बिबट संघर्ष कमालीचा वाढलेला आहे. आज जे काही मानवी वस्तीमध्ये शिरून बिबट हल्ले करत आहेत, त्यामुळे जी जिवीतहानी होते आहे, ती कधीही न भरुन निघणारी आहे.
पण हल्ले का होत आहेत, पुढे चालून हे बिबट मानव संघर्ष बिकट होऊ नये, यासाठी काय केले पाहिजे, हे शोधून काढण गरजेचे आहे. ते होऊ नये म्हणून जे काही सध्या उपाय सुरू आहेत, ते म्हणजे रोग न ओळखताच उपचार करण्याच्या प्रयत्न करत आहोत का? असा विचार येतो. बिबट मानवी वस्तीत दिसु लागले तसं बिबटची संख्या वाढत आहे, अशी चर्चा सुरू झाली. हे म्हणजे सहज कुठलाही अभ्यास न करता निष्कर्ष देऊन मोकळ झाल्या सारखे वाटते.
आज सीसीटीव्हीसारख्या सोयी असल्या कारणाने मानवी वस्तीतील त्यांच्या हालचाली लगेच दिसून येतात. किंवा कधी कोणाला दिसल्यास सहज मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपुन व्हायरल केल्या जातात. बिबट पुर्वी आपल्या अवती भोवती असलेल्या त्यांच्या शाश्वत आदिवासामध्ये अंतर ठेवून राहत होते. तर कधी अनावधानाने चुकून मानवी वस्ती शिरत होते, पण मानवी हल्ले होतांना दिसत नव्हते.
पण ते पूर्वी सीसीटीव्ही नसल्या कारणाने त्यांच्या हालचाली आपल्याला दिसुन आल्या नाहीत किंवा लक्षात आल्या नाहीत. त्याकाळी मोबाईल कॅमेरा नव्हता  दिसले की फोटो किंवा क्लिप काढून व्हायरल करायला. आता आपल्याकडे उपलब्ध सीसीटीव्हीसारख्या चांगल्या सुविधांमुळे ते सहजासहजी दिसुन येत आहेत. यानुसार संख्या वाढलीचा निष्कर्ष काढून मोकळे होत आहोत.
 
जर खोलात जाऊन विचार केला तर नक्कीच लक्षात येईल की बिबट हे आपला आदीवास सोडून मानवी वस्तीमध्ये, शेतीमध्ये का घुसत आहेत. त्यासाठी बिबट त्यांच्या ज्या आदिवासातून बाहेर पडत आहेत, आपण त्या आदिवासाचा आधी सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे. त्याचा अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येईल की आजकाल जे काही थोड्याफार शिल्लक राहिलेल्या जंगलांमध्ये तिथे असलेल्या  सुरक्षित परीसरात त्यांच्या पारंपरिक चालत आलेल्या आदिवासांमध्ये नेमकं काय घडतय, की त्यामुळे त्यांना बाहेर पडुन शिकार करण्याची गरज का भासते आहे.
निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल, जे काही असे शाश्वत बिबटचे अधिवास शिल्लक आहे. अशा ठिकाणी,आक्रमण करणाऱ्या परदेशी वनस्पती जसे गुलतुरा (घाणेरी), रानमारी, कॉसमॉस, रानतुळस, सारखे झुडूप, भोंवरी (Ipomoea tribolia) सारख्या उपद्रवी पावसाळी वेली, वेडी बाभूळ इत्यादी सारख्या वनस्पतींचे प्रचंड प्रमाणात राखीव जंगल परिसरात अतिक्रमण होत आहे. यामुळे रानससे, मुंगूस, उदमांजर, घोरपड इत्यादी सारखे वन्यजीवांची शिकार मिळण यामुळे कठीण झाले आहे.
घाणेरी सारख्या काटेरी, रानमारी, रानतुळस सारख्या उग्र वास असलेल्या व दाट वाढणाऱ्या अतिक्रमित उपद्रवी झुडप व वेंलींमुळे, तर काही ठिकाणी वेडी बाभूळ सारख्या झुडपांमुळे शिकार शोधण्यास व शिकार दिसल्यास ती करण्यास अडचणी येतात. त्यात भर म्हणजे यावर्षी मे पासूनच, पावसाळा सुरू झाला आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे जमीनीचा ओलसरपणा कमी होत नाहीये. त्यामुळे पण ते त्रस्त झालेत. दुसरीकडे अतिक्रमित वनस्पतींचा अजूनच पसारा प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून येतो.
अशा निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत, भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट, तरस सारख्या वन्यजीवांना मानवी वस्ती हे सोपी आणि सरळ शिकार मिळण्याचे ठिकाण दिसू लागले आहे. यासाठी आपल्याला आता दूरदृष्टी ठेवून आधी या अधिवासामधील घाणेरी, रानमारी, कॉसमॉस, रानतुळस इत्यादी व उपद्रवी पावळी वेली, सारख्या जंगलातील निरुपयोगी आणि धोका ठरू पाहणाऱ्या वनस्पतींचे उच्चाटन करणे गरजेचे झाले आहे. जेणे करून या वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित होऊन पुन्हा ते आपल्या आदिवासांमध्ये परतून तिथेच भुक शमवण्यासाठी व निवासासाठी जागा शोधून मानवी वस्ती पासून लांब राहतील.
हे तेवढेच प्रखरपणे लक्षात येते की, विविध प्रकारे होणाऱ्या मानवी हस्तक्षेप व अतिक्रमण करणाऱ्या वनस्पतींमुळे त्यांच्या मूलभूत अधिवासांवर गदा आलेली आहे. त्यामुळे भुक भागवण्यासाठी मानवी वस्तीतले हल्ले वन्यजीवांकडुन वाढत आहेत. यापुढेही आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर, यापेक्षाही भयानक परिस्थिती आपल्या पुढे निर्माण होणार आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊन वृक्षारोपण करण्याबरोबरच किंवा असे या घातक वनस्पतींचा नायनाट करून हे अधिवास बिबट व तरस सारख्या वन्य जीवांसाठी शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच मानव व बिबट संघर्ष टाळण्यास मदत होईल.
लक्षात घ्या या पूर्वीही बिबट आपल्या हक्काच्या अधिवासात संख्येने होते. बिबटच्या बाबतीत अनुभव सांगावासा वाटतो, तो म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून, बिबट नाशिक देवराई येथे अधुन मधुन वास्तव्यास येत असतो. कधी एकटा तर कधी जोडीने पिल्लासह वावर असतो. पण आजपर्यंत कधी त्रास दिला नाही.
बराच वेळा असा प्रसंग आलेला आहे. ६० ते ७० फुटावर गवतात असलेल्या बिबट्याने स्वतःच अस्तित्व म्हणजे मी इथे उपस्थित आहे, तुम्ही जास्त जवळ येऊ नका. उद्देशाने गुरगुर करून ताकीद दिली आहे. त्यावेळी आम्ही त्यापासून दूर जाऊन काम करतो. सांगायचा चा उद्देश इतकाच की, बिबट हा मानवी शिकार करणारा वन्यजीव असता तर आज मानव दुर्गम भागांमध्ये राहू शकला नसता.
- शेखर गायकवाड, 
आपलं पर्यावरण संस्था, नाशिक
 
