जळगाव : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी घोषित केल्याने लाखों शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या या घोषणेमुळे लाखो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.
या कर्जमाफीमुळे केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर जिल्हा बँकेलाही मोठी आर्थिक उभारी मिळणार आहे. खासगी बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्यासाठीही हाच निकष लागू आहे.
२ लाखांवरील कर्जदारांना 'ही' अट पूर्ण करावी लागणार
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा १० हजार ८६१ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागेल. या शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांच्या वरील उर्वरित रक्कम बँकेत भरल्यास, त्यांनाही शासनाच्या या कर्जमाफी योजनेचा लाभ घेता येईल.
असा होणार शेतकऱ्यांना फायदा...
ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. नियमित कर्ज फेडणारे जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
शासनाचा हा निर्णय ऐतिहासिक असून यामुळे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होईल. भविष्यात कर्जमाफी मिळेल की नाही, याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांच्या वर आहे, त्यांनी तातडीने वरील रक्कम भरून या संधीचा लाभ घ्यावा आणि आपले खाते कर्जमुक्त करावे.
- संजय पवार, चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
