- रतन लांडगे
भंडारा : पारंपारिक शेतीचे चित्र बदलून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पवनी तालुक्यातील वलनी चौरास येथील प्रयोगशील शेतकरी लोमेश सेलोकर यांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून कलिंगड व खरबूज शेती करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
केवळ दोन ते तीन महिन्यांच्या कलिंगड (टरबूज) व खरबूज पिकातून त्यांनी मल्चिंग आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून दरवर्षी लाखोंचा नफा कमवित आहेत. त्यांची ही यशोगाथा आज अनेक हताश व निराश शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.
लोमेश सेलोकर यांनी दीड एकर जमीनीवर कलिंगड व खरबूज पिकांची लागवड केली आहे. शेतीमध्ये केलेले अचूक नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे त्यांच्या यशाचे मुख्य कारण आहे. त्यांनी जमिनीवर मल्चिंग पेपर वापरला. यामुळे तणांची वाढ थांबते, पाण्याची बचत होते आणि जमिनीतील ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे कलिंगडाच्या व खरबूजाच्या फळांची गुणवत्ता सुधारली.
मल्चिंग पेपरवर योग्य अंतरावर छिद्रे पाडून त्यांनी रोपांची शास्त्रीय लागवड केली. ते पिकाच्या गरजेनुसार जास्तीत जास्त सेंद्रिय खते, जैविक खते आणि कमीतकमी रासायनिक खतांचा वापर करतात.
वेळेचे व्यवस्थापन
कलिंगड व खरबूज हे तुलनेने कमी कालावधीत, म्हणजेच ५५ ते ६० दिवसांत विक्रीसाठी तयार होणारे पीक आहे. लोमेश सेलोकर यांनी अचूक वेळी लागवड करून उन्हाळ्याच्या सुरुवातीला उच्च मागणीचा अंदाज घेऊन पीक बाजारात यावे म्हणून नुकतीच लागवड केली आहे. मल्चिंग आणि ठिबक सिंचनाचा वापर केल्यास प्रति एकरी २५ ते ३५ टनांपर्यंत कलिंगडाचे उत्पादन मिळू शकते. शेणखत आणि निंबोळी पेंड यांसारख्या घटकांचा समावेश आहे.
जवळपास आठ किलो वजन होणाऱ्या पट्टेदार कलिंगडची लागवड केली आहे. पाच-सहावर्षांपूर्वी मी कलिंगड व खरबूज लागवड करायला सुरुवात केली. तेव्हा मला फारसा अनुभव नव्हता. फक्त नफा कमी व्हायचा. मात्र त्यानंतर मी नवे ज्ञान, नवे तंत्र शिकत गेलो आणि सुरुवातीच्या एक वर्षानंतरच प्रत्येक वर्षी मला नफा मिळतोय. व पाण्याचीही बचत झाली.
- लोमेश सेलोकर, प्रयोगशील शेतकरी
