Wakhar Corporation : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, म्हणून अनेक शेतकरी वखार महामंडळाच्या गोदामात माल साठवतात. मात्र, याच गोदामात साठवलेल्या धान्याला कीड लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Wakhar Corporation)
त्यामुळे शेकडो क्विंटल शेतमालाची नासाडी झाली असून, शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.. (Wakhar Corporation)
इसापूर येथील शेतकरी गणेश सीताराम जगताप यांनी ९६ कट्टे हळद वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली होती. भाव वाढल्यानंतर विक्री करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, काही दिवसांतच साठवलेल्या हळदीला कीड लागल्याने ती निकामी झाली. सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. (Wakhar Corporation)
शेतकऱ्यांचा नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा
शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे धाव घेत निवेदन सादर केले आहे.
निवेदनावर श्रीराम पवार (खांबाळा), गणेश जगताप (इसापूर), रामेश्वर शिंदे (सावा), दिलीप कुटे (हिंगोली), गजानन बांगर (हिंगोली), बापूराव बांगर (हिंगोली) या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गोदामातच कीड लागली, जबाबदारी कोणाची?
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल साठवताना आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही.
नियमित तपासणी आणि कीडनाशक फवारणी न झाल्याने माल खराब झाला. शेतकऱ्यांनी याबाबत साठा अधीक्षकांना कळवले, मात्र त्यांनीही जबाबदारी टाळली.
नुकसानभरपाईची मागणी
कीडग्रस्त धान्याचा तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
'आम्ही माल कीडमुक्त आणि सुरक्षित राहावा म्हणून सरकारी गोदामावर विश्वास ठेवला. आता तोच माल निकामी झाला तर जबाबदारी कोण घेणार?' असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
शेतकऱ्यांची नाराजी वाढली
या घटनेमुळे शेतकऱ्यांतून प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, वखार महामंडळाच्या व्यवस्थापनावर चौकशीची मागणी होत आहे. आता या प्रकरणात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते का, आणि वखार महामंडळ कोणती कारवाई करते, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतमाल साठवताना गोदाम निवडताना आवश्यक ती स्वच्छता, हवेशीर व्यवस्था आणि कीडनाशक तपासणीचे प्रमाणपत्र तपासणे गरजेचे आहे. माल दीर्घकाळ ठेवायचा असल्यास दर महिन्याला स्वतः निरीक्षण करावे, तसेच अधिकृत नोंद ठेवावी.