Vihir Anudan : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. (Vihir Anudan)
या विहिरींची कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्यात आली असून काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटनही झाले आहे. मात्र, काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले तरी शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान अद्याप वितरित न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.(Vihir Anudan)
मनरेगा योजनेअंतर्गत विहिरीसाठी शेतकऱ्यांनी आधी खर्च करून कामे पूर्ण केली. मजुरी, साहित्य, खोदकाम यासाठी मोठा खर्च झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी बँक किंवा खासगी सावकारांकडून कर्ज घेतले.
अनुदान वेळेत मिळेल, या अपेक्षेवर त्यांनी हा खर्च केला होता. मात्र प्रत्यक्षात अनुदान रखडल्याने कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.(Vihir Anudan)
शेतकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित कार्यालये, पंचायत समिती व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. 'लवकरच अनुदान मिळेल' अशी आश्वासने देण्यात आली, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिकांची देखभाल, खत–औषधांचा खर्च आणि घरखर्च यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत मनरेगाचे रखडलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे.
मनरेगा सारख्या महत्त्वाच्या योजनेतून सिंचन सुविधा निर्माण होत असताना अनुदान वितरणात होणारा विलंब शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारा ठरत आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
