Vidarbha Orange Farmers Crisis : विदर्भाचा 'कॅलिफोर्निया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी पट्ट्यात संत्रा हे प्रमुख फळपीक आहे. (Vidarbha Orange Farmers Crisis)
या भागात सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा उत्पादन घेतले जाते. मात्र दरवर्षी उत्पादन चांगले होत असतानाही संत्रा उत्पादकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.(Vidarbha Orange Farmers Crisis)
यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे या भागात एकही संत्रा प्रक्रिया उद्योग नसणे, असे शेतकरी सांगत आहेत.(Vidarbha Orange Farmers Crisis)
या पट्ट्यातील एकूण उत्पादनातील सुमारे ४० टक्के संत्री आकाराने लहान असल्याने बाजारात त्यांना योग्य दर मिळत नाही. परिणामी ही संत्री मातीमोल भावात विकावी लागतात किंवा अनेकदा शेतकऱ्यांना ती फेकून देण्याची वेळ येते.
प्रत्यक्षात ही लहान संत्री ज्यूस, पल्प, पावडर यांसारख्या प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. मात्र प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही.
आंबिया आणि मृग बहरालाही कमी दर
या भागात आंबिया आणि मृग बहरातील संत्र्यांना देखील अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
संत्रा पिकासाठी सर्वंकष धोरण नसल्याने दरातील चढ-उतार, उत्पादन खर्च वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे संत्रा उत्पादकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय डिंक्या व कोळशीचा प्रादुर्भाव, नैसर्गिक आपत्ती, तंत्रज्ञानाचा अभाव, सिंचनाचे कमी प्रमाण, निर्यात धोरणातील मर्यादा आणि सदोष फळपीक विमा योजना यांसारख्या अनेक समस्या संत्रा उत्पादकांना भेडसावत आहेत.
प्रक्रिया उद्योगासाठी 'तारीख पे तारीख'
संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी गेल्या अनेक दशकांपासून घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात प्रकल्प उभा राहिलेला नाही. १९५७, १९६३, १९९२, १९९५, २०१४, २०१७, २०१९ आणि २०२१ च्या अर्थसंकल्पात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबाबत घोषणा करण्यात आल्या. मात्र या घोषणा प्रत्यक्षात कधीच साकार झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
काही प्रकल्प कागदावरच राहिले, तर काही सुरू होण्याआधीच बंद पडल्याची उदाहरणे आहेत. २०१४ मध्ये जाहीर झालेला एक प्रकल्प नांदेडला हलविण्यात आला आणि तेथे तो सुरू झाला. मात्र वरूड-मोर्शी पट्ट्यात आजही प्रक्रिया उद्योगाची प्रतीक्षा कायम आहे.
शेतकऱ्यांची मागणी
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, वरूड-मोर्शी पट्ट्यात प्रक्रिया उद्योग उभारला गेला तर लहान संत्र्यांनाही चांगला दर मिळू शकतो. सध्या नांदेडसारख्या दूरच्या ठिकाणी संत्री पाठविणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने या भागात तातडीने संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे.
विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी प्रक्रिया उद्योग उभारला गेला तर केवळ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, तर संत्रा आधारित उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीलाही मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
