गडचिरोली : पावसाळा सुरू झाला की, भाजीपाल्याच्या (Fegetable Farming) किमती आकाशाला भिडलेल्या असतात. पावसाळ्यात उघड्यावरील भाजीपाला शेती फायद्याची ठरत नाही. अशावेळी शेडनेटमध्ये भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या नियोजनातून भाजीपाल्याचे उत्पादन घेता येते. शेडनेटमधील शेती शेतकऱ्यांना पावसाळ्यातही मालामाल करते.
पावसाळ्यात (Rainy Season) टोमॅटो, वांगी, मेथी, मुळा, भेंडी, मिरची, कोथिंबीर, पालक हा भाजीपाला बाजारात येत असला, तरी त्याच्या किमती फारच जास्त असतात. पावसाळ्यात श्रावणमास, गणेशोत्सव व इतर महत्त्वाचे सण येतात. या काळात बाजारात भाजीपाल्याची जास्त मागणी असते. पण मागणीनुसार भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून पुरवठा नसतो.
पावसाळ्यात भाजीपालापूरक (Bhajipala Sheti) परिस्थिती नसते. अशावेळी शेडनेटमधील शेती फारच महत्त्वाची ठरते. शेडनेट शेतीवर पावसाचा, उन्हाचा परिणाम होत नाही. त्यामुळे अति उन्हात आणि अति पावसाळ्यातही उत्पादन घेता येते. या शेतीसाठी जास्त पाणी लागत नाही. खुल्या जागेपेक्षा शेडनेटमध्ये उत्पन्न घेतल्यास ५० टक्के अधिक उत्पन्न येते. याकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे.
कृषी विभागाने जागृती करण्याची गरज
शेडनेट शेती अतिशय फायद्याची आहे. कमी खर्चात कोणत्याही ऋतुत उत्पादन घेता येते. राज्यातील अनेक शेतकरी शेडनेट शेतीकडे वळले आहेत. शासनाकडून शेडनेट उभारण्यासाठी अनुदान सुद्धा दिले जाते. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना या शेतीचे फायदे, शासनाच्या योजनांची माहिती नाही. परिणामी लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
शेडनेट शेती करायची असल्यास कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. ज्यात काही नियम आहेत, त्यांची पूर्तता केल्यास त्या योजनेचा लाभमिळतो. शेतकरी एक गुंठ्यातही शेती करू शकतो.
- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी
शेडनेट शेतीवर जास्त उन्हाचा आणि जास्त पावसाचा परिणाम होत नाही. बाजारात ज्यावेळी भाजीपाल्याची किंमत जास्त असते, तेव्हा नियोजन करून उत्पादन घेता येते. ही शेती फायद्याची ठरते. शेडनेटच्या शेतीत बारमाही उत्पादन घेता येते.
- हिरामण गराटे, शेतकरी, चिखली (रीठ)