हिंगोली : हिंगोली जिल्ह्याची ओळख असलेल्या 'वसमत हळदी'ला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळवून देण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, या मानांकनाचा अधिकृत वापर करता यावा, यासाठी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे (KVK) प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी केले आहे.
वसमत येथील 'सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' आणि 'नाबार्ड' यांच्या संयुक्त विद्यमाने या संदर्भात ऑनलाईन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नाबार्डच्या पुणे विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, नाबार्डचे हिंगोली जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) लहाने, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके आणि सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड उपस्थित होते.
बैठकीमध्ये नाबार्डच्या पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी 'वसमत हळद' जी.आय. टॅग (Basmat Haldi GI Tag) वापरण्यासाठी शेतकऱ्यांच्या अधिकृत नोंदणी प्रक्रियेवर भर दिला. ही प्रक्रिया राबवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने (KVK) सूर्या एफपीसीला मदत करावी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशी सूचना नाबार्डने केली.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व शुल्क
शेतकऱ्यांना 'अधिकृत वापरकर्ता' (Authorized User) म्हणून नोंदणी करण्यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
- हळद पीक पेरा दर्शविणारा ७/१२ चा उतारा.
- आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
- केवळ १० रुपये नोंदणी शुल्क.
तसेच अधिक माहितीसाठी सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. वसमत-परभणी रोड, तेलगाव, ता. वसमत, जि. हिंगोली. यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमाचे कौतुक करताना डॉ. पी. पी. शेळके म्हणाले की, "श्री. प्रल्हाद बोरगड आणि सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने वसमतच्या हळदीला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या प्रक्रियेत कृषी विज्ञान केंद्र पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील."
डॉ. शेळके यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, *"वसमत आणि परिसरातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी भविष्यातील बाजारपेठेचा विचार करता, आपल्या हळदीला 'वसमत हळद' हे मानांकन मिळवण्यासाठी तातडीने नोंदणी करावी. यासाठी आवश्यक कागदपत्रे (७/१२ आणि आधार कार्ड) व १० रुपये शुल्क घेऊन सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या तेलगाव (ता. वसमत) येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
