Agriculture News : निसर्गाशी नातं जपणारे अनेकजण आजकाल घराभोवती फुलझाडे, भाजीपाला किंवा छोटेखानी बाग तयार करताना दिसतात. मात्र, सेवानिवृत्त वन अधिकारी अशोक खुणे यांनी नवेगावबांध येथे आपल्या घराच्या टेरेसवर उभारलेलं गार्डन हे केवळ छंद नसून एक प्रेरणादायी प्रयोग ठरत आहे. ग्रामीण भागातही आधुनिक टेरेस गार्डनिंगची यशस्वी अंमलबजावणी कशी करता येते, याचं हे उत्तम उदाहरण मानलं जात आहे.
आज पुणे आणि मुंबई सारख्या महानगरांमध्ये टेरेस गार्डनची वाढती क्रेझ पाहायला मिळते. त्याच धर्तीवर नवेगावबांध येथील हे गार्डन ग्रामीण भागातील एक वेगळा आदर्श ठरत आहे. अशोक खुणे यांनी जगभरातील दुर्मिळ फळझाडे विमान पार्सलद्वारे मागवून आपल्या टेरेसवर लावली आहेत.
मनिला टेनिस बॉल चेरी, ऑस्ट्रेलियन रेड हायब्रीड जाबोटीकाबा, ब्राझील डायना फिग (अंजीर), पर्पल स्टार अॅपल, रिओ ग्रांडे चेरी, मिरेकल फ्रूट, जाबोटीकाबा प्रोसेई, जैमेकन चेरी, झिल्स सुरीनाम चेरी, बार्बाडोस चेरी, सिडार बे चेरी तसेच मेक्सिको मूळ असलेले अव्हाकाडो अशी एकूण १२ विदेशी फळझाडे त्यांनी यशस्वीपणे वाढवली आहेत.
यातील अनेक प्रजाती मूळच्या ब्राझील आणि दक्षिण अमेरिकन प्रदेशातील असल्याने भारतीय हवामानात त्यांची लागवड करणे मोठे आव्हान मानले जाते; मात्र योग्य निगा आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी हे शक्य करून दाखवले आहे. विदेशी झाडांसह त्यांनी २९ आंबा कलमांची लागवड केली आहे. त्यात तब्बल २६ जातिवंत आंबा प्रजातींचा समावेश आहे. कुंड्यांमध्ये आंब्याची निरोगी वाढ साधणे कठीण मानले जाते, परंतु योग्य माती मिश्रण, सेंद्रिय खत आणि नियमित देखभाल यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
या टेरेस गार्डनमध्ये फळझाडांबरोबरच भेंडी, टोमॅटो, वांगी, मेथी, मिरची, कोथिंबीर यासारखा भाजीपाला तसेच विविध फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व झाडांसाठी घरच्या घरी तयार केलेल्या कंपोस्ट खताचा १०० टक्के वापर केला जातो. रासायनिक खतांशिवायही निरोगी उत्पादन घेता येते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.
'सुपरफूड' म्हणून ओळख
या गार्डनमधील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे जाबोटीकाबा प्रकारातील झाडे. या झाडांना फळे फांद्यांऐवजी थेट खोडावर घोसाने लागतात. काळसर-जांभळ्या रंगाच्या या बेरी अत्यंत पोषक मानल्या जातात. त्यापासून तयार होणारा ज्यूस आंतरराष्ट्रीय बाजारात महागडा असून, त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल्स आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. आरोग्याला उपयुक्त गुणधर्मामुळे या फळांना 'सुपरफूड' म्हणून ओळख मिळाली आहे.
टेरेसचा योग्य उपयोग
दिवसभरातील बराचवेळ झाडांची निगा राखण्यात जात असला, तरी स्वतःच्या घरी दुर्मिळ विदेशी फळे पिकवून त्यांचा आस्वाद घेण्याचे समाधान वेगळेच असल्याचे अशोक खुणे सांगतात. मर्यादित जागेतही नियोजन, अभ्यास आणि निसर्गप्रेमाच्या जोरावर टेरेसला हिरवाईने नटवता येते, याचा त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.
