Tur Crop Management : विदर्भातील अनेक भागांत तुरीच्या पिकावर हवामान बदलाचा आणि कीडरोगांचा मोठा फटका बसत आहे. हजारो हेक्टरमध्ये उभ्या असलेल्या तुरीच्या पिकाला फुलगळ आणि शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Tur Crop Management)
अकोल्यात मोठ्या प्रमाणावर फुलगळ
अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीची पेरणी झाली. सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाल्याने तुरीकडून भरघोस उत्पादनाची आशा होती.
मात्र सतत बदलणारे तापमान, थंडीची अचानक वाढ, पहाटे–रात्री तापमानातील चढ-उतार यामुळे तुरीची फुले गळत आहेत आणि कळी व शेंगा धरण्याच्या प्रक्रियेला मोठा फटका बसत आहे.
थंडी आणि दमट वातावरणामुळे पेशींना हानी
तापमान कमी झाल्यावर वनस्पतीतील पेशींमधील पाणी आकसते. त्यामुळे फुलगळ वाढते आणि शेंगांची वाढही मंदावते. तूर कोरडवाहू पट्ट्यात असल्याने हा परिणाम अधिक जाणवत आहे.
फुलगळ रोखण्यासाठी आवश्यक उपाय
कडधान्य संशोधन विभागाने शास्त्रीय उपाय सुचवले आहेत.
* विशिष्ट फवारणी
नेफ्थलीन ॲसिटिक ॲसिड – ४० पीपीएम (फुलकळी येण्याच्या काळात)
बोरॉनची फवारणी – फुलांची गुणवत्ता सुधारते, परागीकरण वाढते
डीएपी किंवा पोटॅश द्रावण – वनस्पतीत पोषणद्रव्यांची उपलब्धता वाढते
* पाणी व्यवस्थापन
फुलोऱ्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण लागू देऊ नये
थंडीची लाट असल्यास पहाटे हलके सिंचन करून तापमान स्थिर ठेवावे
शक्य असल्यास पहाटे ४ ते ७ वाजता धूर व्यवस्थापन करावे
कळी, शेंगा व दाणे भरण्याच्या अवस्थेत ओलीत देणे आवश्यक
रामटेकमध्ये अळ्यांचा कहर – शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव
रामटेक तालुक्यात चार दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान टिकून आहे.
या हवामानामुळे फुले गळण्याचा वेग वाढला
शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा (Pod borer) प्रादुर्भाव तीव्र झाला
तालुक्यातील २,५०० हेक्टरवरील तुरीचे पीक धोक्यात आहे.
स्थिती कशी बिघडली?
काही क्षेत्रांत शेंगा लागल्या आहेत, तर काही ठिकाणी फुलोरा सुरू
दमट हवामानात अळींची वाढ अतिवेगाने होते
अळ्या शेंगा पोखरून आतील दाणे खातात, त्यामुळे थेट उत्पादन घटते
तुरीचा दर चांगला असल्याने शेतकरी मोठ्या अपेक्षेने शेती करत असतानाच हा धक्का बसला
शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली असली तरी त्याचा पुरेसा परिणाम दिसत नसल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली आहे.
शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन
तज्ज्ञांनी खालील उपाय सुचवले आहेत
* कीटकनाशक फवारणी (परिस्थितीनुसार एकाचचा वापर)
निंबोळी अर्क
क्विनॉलफॉस
इमामेक्टीन बेन्झोएट
ॲझाडिरेक्टीन
लॅम्डा सायहॅलोथ्रीन
इथिऑन
* सुरुवातीच्या अवस्थेतील व्यवस्थापन
डायकोफॉल
डायफेनथिअरॉन
गंधक
* फुलगळ + कीड प्रादुर्भाव एकत्र असल्यास
मेटालॅक्झिल + मन्कॉझेब बुरशीनाशकांची संयुक्त फवारणी
* पाणी व्यवस्थापन
अळी प्रादुर्भावाच्या काळातही पाण्याचा ताण बसू देऊ नका
* आवश्यकतेनुसार हलके सिंचन
अळींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे खर्च वाढले आहेत. कीटकनाशके आणि बुरशीनाशके महाग असल्याने उत्पादन खर्च झपाट्याने वाढतो आहे.
* बाजारभाव आणि संभाव्य नुकसान
ताजी शेंगा : १२० रु. / किलो
वाळलेली तूर : ६ हजार रु. / क्विंटल
फुलगळ आणि अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन १० ते ३० टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन
* फुलोऱ्याच्या अवस्थेत हलके व नियमित सिंचन
* योग्य औषधांची फवारणी
* सकाळी धूर व्यवस्थापन
* शेतात फेरफटका मारून पीक निरीक्षण
* कीड नियंत्रणासाठी शेतात फेरोमोन ट्रॅप्स
* अळी आढळताच त्वरित उपाययोजना
पाण्याचा ताण होऊ देऊ नये
फुले येण्याच्या काळात पाण्याचा ताण होऊ देऊ नये. थंडीची लाट आली तर हलके सिंचन देऊन तापमान स्थिर ठेवावे. शक्य असल्यास पहाटे चार ते सकाळी ७ वाजताच्या दरम्यान धूर व्यवस्थापन करावे, पीक कळी अवस्थेत व शेंगा लागण्याच्या, दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना ओलीत करावे, असा सल्ला कडधान्य संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोलाचे डॉ. प्रदीप ठाकरे व डॉ. विजय गावंडे यांनी दिला.
