Traditional Crops Cultivation : बदलते हवामान, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे एकेकाळी शेतातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असलेल्या जवस आणि ओवा या पारंपरिक पिकांचे खुलताबाद तालुक्यातील इंदापूर परिसरात पुन्हा एकदा पुनरागमन झाले आहे. (Traditional Crops Cultivation)
काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जवळपास नामशेष झालेली ही पिके पुन्हा शेतात दिसू लागल्याने कृषी क्षेत्रात सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे.(Traditional Crops Cultivation)
गेल्या काही वर्षांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका, कापूस, ऊस, सोयाबीन आणि कांदा यांसारख्या नगदी पिकांकडे वळला. परिणामी तीळ, उडीद, नाचणी, ओवा आणि जवस यांसारखी पौष्टिक, कमी खर्चिक आणि जमिनीच्या आरोग्यास पोषक पिके हळूहळू शेतातून गायब झाली. (Traditional Crops Cultivation)
बाजार सावंगी व आसपासच्या परिसरात या पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली होती. मात्र इंदापूर परिसरातील काही शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक शेतीकडे वळत जवस आणि ओव्याची लागवड करून नव्या आशा निर्माण केल्या आहेत.(Traditional Crops Cultivation)
कमी खर्च, अधिक उपयुक्तता
जवस हे वेलवर्गीय पिकांच्या श्रेणीत येते आणि ते अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. ओमेगा-३ फॅटी अॅसिड्समुळे जवसाला आहारात मोठे महत्त्व आहे. इतर नगदी पिकांच्या तुलनेत जवस आणि ओवा या पिकांना खत व औषधांचा खर्च अत्यंत कमी लागतो.
कमी पावसातही ही पिके तग धरतात, त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर ही पिके शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. शिवाय, या पिकांमुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते, असे कृषी तज्ज्ञ सांगतात.
अल्प प्रमाणात पेरणी, तरीही आशादायी सुरुवात
खुलताबाद तालुक्यात यावर्षी जवसाची लागवड सुमारे पाच ते आठ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी हे क्षेत्र शेकडो हेक्टरमध्ये होते. सध्या मात्र ही लागवड प्रामुख्याने घरगुती वापरासाठी किंवा प्रयोगशील शेतीच्या दृष्टीने केली जात आहे.
ओव्याची लागवड जवसाच्या तुलनेत आणखी कमी असून ती केवळ दोन ते तीन हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. तरीही या अल्प क्षेत्रातील पेरणी भविष्यात मोठ्या बदलाची नांदी ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शासनाकडून पाठबळाची अपेक्षा
इंदापूर परिसरात मर्यादित प्रमाणात का होईना, जवस आणि ओव्याची पेरणी झाल्याने या पारंपरिक पिकांना पुन्हा चांगले दिवस येतील, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, या पिकांचा विस्तार व्हायचा असेल तर शासनाकडून योग्य बाजारपेठ, हमीभाव आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
प्रक्रिया उद्योगांना चालना, मूल्यवर्धन आणि थेट विक्रीच्या सुविधा उपलब्ध झाल्यास जवस, ओवा पिके शेतकऱ्यांसाठी पुन्हा फायदेशीर ठरू शकतात.
एकूणच, नगदी पिकांच्या गर्दीत हरवत चाललेल्या पारंपरिक पिकांना इंदापूरच्या शेतकऱ्यांनी पुन्हा शेतात स्थान दिले असून, ही चळवळ भविष्यात शाश्वत व पोषणमूल्याधारित शेतीचा नवा मार्ग दाखवेल, अशी आशा कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
