परभणी : ग्रामीण भागातील पारंपरिक शेती पद्धती आता झपाट्याने बदलताना दिसत असून, बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याचे चित्र परभणी जिल्ह्यात स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. (Tractor Demand)
शेतीतील कामांचा वाढता वेग, मजुरांची कमतरता, बैलांच्या संगोपनाचा वाढता खर्च आणि शासकीय अनुदान योजनांचा लाभ यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात यांत्रिक शेतीकडे वळत आहेत. परिणामी, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ट्रॅक्टर विक्रीत सुमारे ५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.(Tractor Demand)
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू झाली असून, विविध ट्रॅक्टर शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.
विशेषतः ४० ते ५० हॉर्सपॉवर क्षमतेच्या ट्रॅक्टरना शेतकऱ्यांकडून अधिक पसंती मिळत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
बैलजोडी सांभाळणे झाले महागडे
परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षांत बैलांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. बैलांसाठी लागणारा चारा, औषधोपचार, देखभाल आणि मजुरांचा वाढता खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांना बैलजोडी सांभाळणे परवडेनासे झाले आहे.
ग्रामीण भागातून शहरांकडे वाढते स्थलांतर झाल्याने शेतीकामासाठी मजूर मिळणेही कठीण झाले आहे. पेरणी, खुरपणी आणि कापणीसारख्या कामांसाठी मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
याउलट, ट्रॅक्टर आणि त्यासोबतची कृषी अवजारे कमी वेळेत अधिक काम करू शकतात. पेरणीपूर्व मशागत, खोल नांगरणी, फवारणी आणि वाहतूक यांसारखी कामे जलद गतीने होत असल्याने ट्रॅक्टर हा अधिक सोयीस्कर आणि दीर्घकालीन पर्याय ठरत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
शासकीय योजनांमुळे वाढली खरेदी
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून विविध योजनांद्वारे अनुदान दिले जात आहे. महाडीबीटी योजनेंतर्गत ट्रॅक्टर आणि कृषी अवजारांवर अनुदान उपलब्ध असून, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचाही शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.
अनुसूचित जाती-जमाती घटकांसाठी विशेष अनुदान योजना तसेच महिला शेतकरी गटांसाठी कृषी यंत्रसामग्री अनुदान योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनांमुळे लहान आणि मध्यम शेतकरीही ट्रॅक्टर खरेदीकडे आकर्षित होत असून, यांत्रिक शेतीचा वापर जिल्ह्यात वेगाने वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
