कैलास निघोट
जंगल परिसरातील आदिवासी कुटुंबांसाठी तेंदूपत्ता संकलन हा केवळ हंगामी व्यवसाय नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार बनला आहे. (Tendu Patta Collection)
नागपूर जिल्ह्यातील देवलापार, पवनी आणि पवनी एकसंध नियंत्रक वनपरिक्षेत्रात सध्या तेंदूपत्ता संकलनाला वेग आला असून, हजारो मजूर कुटुंबांचे अर्थचक्र या 'हिरव्या सोन्या'भोवती फिरताना दिसत आहे.
देवलापार वनपरिक्षेत्रात २२, पवनी वनपरिक्षेत्रात १६ आणि पवनी एकसंध नियंत्रक क्षेत्रात १६ अशी एकूण ५२ तेंदूपत्ता संकलन केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रांमधून मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता संकलन सुरू असून, ग्रामीण भागात रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे.
आदिवासी कुटुंबांसाठी मोठा आर्थिक आधार
दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात सुरू होणारे तेंदूपत्ता संकलन अनेक आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी जीवनाधार ठरते.
सकाळपासून जंगलात जाऊन तेंदूपत्ता गोळा करणारे मजूर संध्याकाळी संकलन केंद्रांवर आपला माल जमा करतात. या कामातून मिळणारे उत्पन्न वर्षभराच्या खर्चासाठी मोठी मदत ठरते.
विशेषतः जंगलालगतच्या गावांमध्ये तेंदूपत्ता हंगामामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. महिलांसह लहान-मोठे कुटुंबीयही या कामात सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मजुरांच्या सुरक्षिततेवर भर
जंगलात काम करताना वन्यजीवांचा धोका, उन्हाचा तडाखा आणि जंगलातील आगीचा संभाव्य धोका लक्षात घेता वन विभागाकडून मजुरांना विशेष सूचना दिल्या जात आहेत.
मजुरांनी समूहाने जंगलात जावे, सतर्क राहावे आणि आगीपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बंसोड आणि अभिजित माने यांनी सांगितले की, तेंदूपत्ता हंगामामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असून, संकलन प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी विभाग सातत्याने देखरेख करत आहे.
केंद्रांवर मूलभूत सुविधांचा अभाव
दुसरीकडे संकलन केंद्रांवर मजुरांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव समोर आले आहे.
मजूर कधी भर उन्हात तर कधी सायंकाळी केंद्रांवर पोहोचतात; मात्र अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावली किंवा प्रथमोपचार पेटी उपलब्ध नसल्याची तक्रार मजुरांकडून व्यक्त होत आहे.
विशेषतः महिलांना आणि वयोवृद्ध मजुरांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संकलन केंद्रांवर किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
'मजुरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य'
तेंदूपत्ता संकलन हा वनालगतच्या आदिवासी कुटुंबांसाठी महत्त्वाचा रोजगाराचा स्रोत आहे. मजुरांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जात आहे. वन विभागामार्फत संकलन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सातत्याने देखरेख केली जात आहे.- शेषराव टुले,वनपरिक्षेत्र अधिकारी
तेंदूपत्ता हंगामामुळे जंगल परिसरातील हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत असला, तरी मजुरांसाठी मूलभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे.
